तपास मोबाईल लोकेशनवर केंद्रीत
By Admin | Updated: July 31, 2014 00:15 IST2014-07-31T00:15:15+5:302014-07-31T00:15:15+5:30
दोन दिवसांपूर्वी रात्रीदरम्यान शहरातील ११ वाहनांवर दगडफेक झाली. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांचे वाहन असल्याने ही घटना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने घेतली जात आहे.

तपास मोबाईल लोकेशनवर केंद्रीत
वाहन तोडफोडप्रकरण : सिसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ठरले व्यर्थ
यवतमाळ : दोन दिवसांपूर्वी रात्रीदरम्यान शहरातील ११ वाहनांवर दगडफेक झाली. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांचे वाहन असल्याने ही घटना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने घेतली जात आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकापुढे या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दगडफेक करणाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे मोबाईल लोकेशनवर हा तपास केला आहे. यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजचा आधार घेण्यात आला मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला नाही.
शहरात दुचाकीवरून धुमाकूळ घालत अज्ञात दोन तरूणांनी दोन दिवसांपूर्वी रात्रीदरम्यान तब्बल ११ वाहनांवर दगडफेक केली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या वाहनालाही लक्ष्य करण्यात आले. घटनेनंतर या संदर्भात वाहन धारक आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यावर तर हा भ्याड हल्ला नव्हता ना, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली.
या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. सुरूवातील सिसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पडताळून दगडफेक करणाऱ्या तरूणांची ओळख पटविण्याचा प्रयत्न झाला. रात्रीदरम्यान ही घटना घडल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अस्पष्ट चित्रीकरण झाले. त्यात केवळ धुमाकूळ घालणाऱ्या तरूणांनी पल्सर दुचाकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे चेहरे मात्र स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी हा तपास मोबाईल लोकेशनवर केंद्रीत केला आहे. ज्या मार्गांवर वाहनांवर दगडफेक झाली. त्या मार्गावरील प्रत्येक चौकातून त्यावेळी कुणा-कुणाच्या मोबाईलचे लोकेशन येत आहे. याची बारकाईने पडताळणी केली जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात दुखावलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा तर हात नाही ना, संशयाची सुई आपल्याकडे वळू नये म्हणून त्यांच्यासोबतच इतरांच्या वाहनांवर दगडफेक करून बनाव तर निर्माण केला नाही ना, याची गोपनीय माहिती काढली जात आहे. असे असले तरी अद्याप पोलिसांना फारसे काही निष्पन्न झालेले नाही.
कॉलडिटेल्सने दहशत
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहनावरील दगडफेकीत त्यांच्यापासून दुखावलेल्याचा तर सहभाग ना, याची पडताळणी करण्यासाठी पोलीस मोबाईल लोकेशन आणि कॉलडीटेल्स घेत असल्याची माहिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे आहे. त्यातूनच मोबाईल लोकेशन व कॉलडीटेल्सची धास्ती अनेकांनी घेतली आहे.
गांजाच्या नशेत कृत्य
वडगाव रोड हद्दीत राहणाऱ्या एका प्रतिष्ठीत कुटुंबातील तरूण गांजाच्या नादी लागला. यापूर्वी तो एका गुन्ह्यात सापडला. मात्र वडीलांचे राजनैतीक संबंध आडवे आल्याने त्यावेळी त्याच्यावर ठोस कारवाई झाली नाही. त्याच तरूणाने आपल्या साथीदाराच्या मदतीने बदली प्रकरणातून हा वचपा काढल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप पोलिसांनी अशा कुठल्याही तरूणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नाही. (स्थानिक प्रतिनिधी)