काटेरी झुडपाने अपघाताला निमंत्रण
By Admin | Updated: October 30, 2015 02:19 IST2015-10-30T02:19:15+5:302015-10-30T02:19:15+5:30
मार्डी ते हिवरा (मजरा) या सात मिलोमीटर लांबीच्या मार्गापैकी ३-४ किलोमीटर मार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे.

काटेरी झुडपाने अपघाताला निमंत्रण
मार्डी : मार्डी ते हिवरा (मजरा) या सात मिलोमीटर लांबीच्या मार्गापैकी ३-४ किलोमीटर मार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांच्या मार्गात काटेरी झुडपे, बाभळी यांचे अतिक्रमण होऊन वाहन चालकांना जीव धोक्यात टाकून वाहन चालविणे भाग पडत आहे.
हिवरा गावाजवळील रस्ता पुरामुळे वाहून गेला आहे. मात्र अद्याप त्याची दुरूस्ती झाली नाही. समोरील पुलाचे सिमेंट पाईप पूर्णपणे कचऱ्याने बुजलेले आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. हिवरा ते मार्डी दरम्यान सुमारे ३-४ किलोमीटरचा मार्ग सुस्थितीत आहे. मात्र नंतरच्या तेवढ्याच मार्गाची खड्डे पडून अत्यंत दुर्दशा झाली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांची खोली दुचाकी व इतर वाहन चालकांना कळत नाही. त्यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे.
आता रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडपे, बाभळी यांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून बचाव करणे व खड्डे टाळणे वाहन चालकांना अशक्य झाले आहे. समोरील वाहन ओलांडून पुढे जाणे वाहन चालकांना धोकादायक ठरत आहे. खड्ड्यांतून वाहन चालविताना बसणाऱ्या धक्क्यांनी प्रवाशांना शारीरिक ईजा होत आहे. प्रवाशांच्या सुविधेकरिता आणि सुरक्षिततेकरिता बांधकाम विभागानें तात्पुरती उपाययोजना करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. (वार्ताहर)