शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पीक कर्ज उचल
By Admin | Updated: August 19, 2015 02:44 IST2015-08-19T02:44:26+5:302015-08-19T02:44:26+5:30
आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पीक कर्जाची उचल करून रक्कम हडपल्याचा आरोप आदिवासी विकास परिषदेच्या पुसद शाखेने उपविभागीय पोलीस ...

शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पीक कर्ज उचल
पुसद : आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पीक कर्जाची उचल करून रक्कम हडपल्याचा आरोप आदिवासी विकास परिषदेच्या पुसद शाखेने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. या प्रकरणी सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखा पुसदचे व्यवस्थापक आणि बँकेतील एका दलालाविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुसद येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतून तालुक्यातील चोंढी येथील प्रल्हाद गुहाडे यांच्या नावावर १ लाख २० हजार रुपये, मनोज चव्हाण १० हजार, आरेगाव येथील प्रल्हाद जमघाडे ५० हजार, काऱ्होडचे संतोष ढगे १ लाख ८० हजार, कृष्णा ढगे १ लाख ७५ हजार, येहळा येथील संभाजी कुरुडे १ लाख ७० हजार, मनोहर ढगे ८८ हजार, चोंढी येथील नारायण व्यवहारे ८० हजार, रामचंद्र पठारे ८० हजार, धरमवाडी येथील राघोजी कुरुडे १ लाख २४ हजार, नारायण डाखोरे एक लाख, विक्रम कुरुडे ९५ हजार, बीबी येथील बाबाराव नथ्थू १ लाख २७ हजार, श्रीराम गडदे १ लाख ६९ हजार रुपये पीक कर्ज परस्पर उचलल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.
तालुक्यातील जवळपास ४० च्यावर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. आदिवासी शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे पैसे बँकेचे व्यवस्थापक सिसोदिया आणि दलाल धीरज ठाकूर रा. धुंदी यांनी संगनमताने काढल्याचा आरोप आहे. बँकेत शेतकरी नीलचा दाखला घेण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. यामुळे शेतकरी आश्चर्यचकित झाले.
पुसद तालुक्यातील या आदिवासी शेतकऱ्यांनी न उचललेले कर्ज कसे भरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्ज उचलून परस्पर रक्कम हडपणाऱ्यांकडूनच ही रक्कम वसूल करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश सिडाम, जिल्हा संघटक रामकृष्ण चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश उमाटे, तालुका उपाध्यक्ष मारोती आगोसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही तर आदिवासी विकास परिषद आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)