केंद्रीय चमूचा शेतकऱ्यांशी संवाद
By Admin | Updated: April 28, 2015 01:31 IST2015-04-28T01:31:13+5:302015-04-28T01:31:13+5:30
केंद्र शासनाच्या विपणन व धोरण विभागाच्या आर्थिक सल्लागार सुनीता छिब्बा यांनी सोमवारी येथील बचत

केंद्रीय चमूचा शेतकऱ्यांशी संवाद
यवतमाळ : केंद्र शासनाच्या विपणन व धोरण विभागाच्या आर्थिक सल्लागार सुनीता छिब्बा यांनी सोमवारी येथील बचत भवनात आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिली जाणारी मदत आणि पुनर्वसन कामाचा आढावा घेतला. काही ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी सुनीता छिब्बा यांनी समन्वयित कृषी विकास प्रकल्प, आत्मा, कृषी विभाग, सहकार विभागाच्यावतीने होत असलेल्या कामांची माहिती घेतली. शेतकरी आत्महत्या आणि त्यामागील कारणे त्यांनी जाणून घेतली. शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक कामे व्हावी, अशी सूचना त्यांनी केली.
या प्रसंगी विविध विभागांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनव्दारे शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यानंतर छिब्बा यांनी लगतच्या मोहा गावातील जामडोह पोडला भेट दिली. या गावातील संतोष कुंभेकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. येरद, चिचघाट तसेच कळंब तालुक्यातील जोडमोहा आणि खटेश्वर येथेही आत्महत्याग्रस्त कुटुंंबाची त्यांनी भेट घेतली. यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी माने, तहसीलदार अनुप खांदे, कळंबचे तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तिरझडाकडे पाठ
कळंब तालुक्याच्या तिरझडा या गावात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. आर्थिक सल्लागार सुनीता छिब्बा यांची या गावाला नियोजित भेट होती. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा बदलला. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. खटेश्वर येथील लक्ष्मण गंगाराम काकडे आणि जोडमोहा येथील शामराव लक्ष्मण आडे या कुटुंबाचे प्रश्न छिब्बा यांनी जाणून घेतले.