बागायतदारांना विमा

By Admin | Updated: April 30, 2015 00:30 IST2015-04-29T22:10:40+5:302015-04-30T00:30:28+5:30

अवकाळी पाऊस : दीड हजार लोकांना मिळणार लाभ

Insurance for Farmers | बागायतदारांना विमा

बागायतदारांना विमा

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फळपीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. १,६४४ बागायतदारांना विमा लाभांश मिळणार आहे.
शासनाकडून फळपीक विमा योजना सुरु आहे. या योजनेंतर्गत उच्चतम तापमान, कडाक्याची थंडी तसेच अवेळचा पाऊस आदी निकष जारी करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. शिवाय आॅक्टोबरमध्ये ३७.५ अंश सेल्सिअस इतके तापमान काही ठिकाणी नोंदविण्यात आले. आंबा पिक विम्याचा कालावधी १ जानेवारीपासून सुरु होतो. फेब्रुवारी महिन्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तत्पूर्वी १,६४४ बागायतदारांनी जिल्ह्यातील १,५७३.८६ हेक्टरवरील आंबा बागांचा विमा उतरवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी ९४ लाख २७ हजार ७०४ इतका प्रिमीअम भरला आहे. किनारपट्टीच्या १५ किलोमीटर आतील भागात ३७.५ अंश सेल्सिअस तर किनारपट्टीपासून १५ किलोमीटर बाहेरील बाजूला ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाला विम्याचा लाभ मिळणार होता.
जानेवारी ते मार्च ५ मि.मी. पेक्षा अधिक व मार्च ते ३१ मेपर्यंत १० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यास लाभ मिळतो. रत्नागिरी जिल्ह्यात २० हजार ७१८.३० हेक्टर आंबा आणि काजूचे ११ हजार ९६.४१ हेक्टर इतके नुकसान झाले आहे. ६४ हजार ८७४ शेतकऱ्यांचे ३१ हजार ८१४.६१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. हेक्टरी १२ प्रमाणे ४९ कोटीचा निधी अपेक्षीत असल्याचे कृषी विभागाचा अंदाज आहे. शासनाकडून नुकसान भरपाई अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, हेक्टरी १२ हजार प्रमाणे निधी अपेक्षीत आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये फळपीक विमा योजना सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. गतवर्षी उच्चतम तापमानामुळे काही बागायतदारांना लाभ मिळाला होता. परंतु किनारी भागातील उच्च तापमान न नोंदविल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, शेतकऱ्यांना पावसामुळे नुकसान झाल्याने विमा योजनेमुळे काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)

वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे बागायतदार चांगलाच वैतागला आहे. विम्याची भरपाईही वेळेत मिळत नसल्याची बोंब बागायतदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नुकसान झाल्याने बागायतदार सध्या मेटाकुटीस आले आहेत.

Web Title: Insurance for Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.