महानिरीक्षक पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
By Admin | Updated: April 19, 2017 01:03 IST2017-04-19T01:03:23+5:302017-04-19T01:03:23+5:30
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी स्थानिक पांढरकवडा

महानिरीक्षक पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
शारदा चौक : आठ जणांना अटक, दोघे पसार, ३८ हजार जप्त
यवतमाळ : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी स्थानिक पांढरकवडा रोडवरील शारदा चौकात राजरोसपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड घातली. या धाडीत ३८ हजार ६२० रुपये रोख जप्त करण्यात आले.
या जुगार अड्ड्यावरून सूत्रधार भरतलाल छेदीलाल भडोच (४५) रा. शारदा चौक यवतमाळ याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. अन्य आरोपींमध्ये प्रदीप जगदीश अग्रवाल (५३) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी, मोहंमद टिनू मोहंमद हसन (४०) रा. कळंब, अरविंद प्रभाकर राठोड (२८) रा. भाग्यनगर, देवीप्रकाश शोभनाथ तिवारी (७०) रा. शारदा चौक, वसीम खॉ मेहबूब खॉ (२८) रा. अलकरीमनगर, कालू मारोती भूतकर (४४) रा. पारवा आणि विवेक वसंत ठाकरे (३६) रा.गणेशनगर वर्धा यांचा समावेश आहे. तर लखन छेदीलाल भडोच (रा.शारदा चौक) व पुंडलिक मडावी (रा.सावरगड) हे फरार आहे.
शारदा चौकात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्याची दखल घेऊन अमरावतीमधील परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक किरण सूर्यवंशी, महानिरीक्षकांचे वाचक उपअधीक्षक रवींद्र पाटील यांच्या पथकाला धाड घालण्याचे आदेश जाधव यांनी दिले. त्यानुसार हे पथक सोमवारी रात्रीच यवतमाळात दाखल झाले. या पथकाने त्या जुगार अड्ड्याची पुन्हा शहानिशा केली. त्याची खात्री पटल्यानंतर दुपारी धाड घालण्यात आली. या धाड पथकामध्ये अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश सुरळकर तसेच पोलीस कर्मचारी मूलचंद्र भांबुरकर, नागसेन वरघट, अरुण मेटे, किरण साधनकर, शरद तायडे, सचिन मिश्रा, युवराज मानमोटे आदींचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
चक्क पोलीस चौकीच्या बाजूलाच जुगार अड्डा !
वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या कित्येक वर्षांपासून हा जुगार अड्डा खुलेआम चालविला जातो. विशेष असे पोलीस चौकीच्या बाजूलाच हा अड्डा आहे. यापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी येथे रुजू झाल्यानंतर लगेच या अड्ड्यावर धाड घालून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता थेट महानिरीक्षकांच्या पथकाने ही धाड घातली. जिल्ह्यात यापूर्वी अमरावतीचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विष्णूदेव मिश्रा यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पिंपळखुटी (ता. पांढरकवडा) येथील जुगार अड्ड्यावर सुमारे आठ वर्षांपूर्वी धाड घातली होती. त्यानंतर महानिरीक्षकांच्या पथकाने घातलेली ही दुसरी धाड आहे.