पोलीस महानिरीक्षक रानडे उमरखेडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:27 IST2019-07-02T21:27:43+5:302019-07-02T21:27:58+5:30
उमरखेड शहरात सोमवारी झालेल्या मूक मोर्चादरम्यान दगडफेकीच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी भेट दिली.

पोलीस महानिरीक्षक रानडे उमरखेडमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : उमरखेड शहरात सोमवारी झालेल्या मूक मोर्चादरम्यान दगडफेकीच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी भेट दिली.
महानिरीक्षक रानडे मंगळवारी सकाळी यवतमाळात दाखल झाले. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते उमरखेडला रवाना झाले. तेथे त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, ठाणेदार अनिल किनगे यांच्याकडून नेमकी परिस्थिती जाणून घेतली. उमरखेडमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश रानडे यांनी दिले. झारखंडमधील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी मुस्लीम समाज बांधवांनी उमरखेड शहरातून मूक मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान बसस्थानक चौकात मोठ्या प्रमाणात दुकानांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर उमरखेडची बाजारपेठ बंद होऊन तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आयोजक आठ जणांना अटक केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महानिरीक्षक रानडे यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.