तरोडा येथील कामांची तपासणी
By Admin | Updated: June 15, 2016 02:50 IST2016-06-15T02:50:01+5:302016-06-15T02:50:01+5:30
तालुक्यातील तरोडा येथे तीन सिमेंट बंधाऱ्यांची कामे अतिशय निकृष्ट होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले.

तरोडा येथील कामांची तपासणी
कळंब : तालुक्यातील तरोडा येथे तीन सिमेंट बंधाऱ्यांची कामे अतिशय निकृष्ट होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. याची दखल घेत सोमवारी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या चमूने सदर बंधाऱ्याची प्रत्यक्ष तपासणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार रणजित भोसले, बेंबळा कालवे विभागाचे सहायक अभियंता आकाश शेंडगे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले, मंडळ अधिकारी पंचबुध्दे, मंडळ कृषी अधिकारी गुल्हाने, कनिष्ठ अभियंता पी.एम. राऊत, कृषी सहायक महेंद्र ओंकार, तलाठी एस. डब्ल्यु तलवारे आदी होते.
अधिकाऱ्यांनी तिनही बंधाऱ्याची पाहणी केली. बंधाऱ्यांची कामे प्राकलनानुसार झाली नसल्याचे पथकाला दिसून आले. खोली बहुतेक ठिकाणी राखली गेली नाही. मातीचे केवळ ढिगारे मारण्यात आले. कुठेही बर्म सोडण्यात आले नाही. आवश्यक ठिकाणी माहिती वाहून नेणे गरजेचे असताना एकही ब्रास माती वाहून नेण्यात आली नाही. त्यामुळे माती नाल्यात पडत असल्याचे स्पष्ट झाले. राजकीय वरदहस्त व अधिकाऱ्यांची टक्केवारी यामुळे हा प्रकार झाल्याचे बोलले जाते.
जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल
तरोडा येथील तिनही बंधाऱ्यांची पाहणी केली. अनेक ठिकाणी दोष आढळून आले. प्राकलनानुसार आणि गुणवत्ता राखुन काम करण्याच्या कडक सूचना दिल्या. पाहणीनंतर निदर्शनास आलेल्या बाबीसंबधीचा अहवाल जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना पाठविला जाईल. त्यानंतरच कारवाईची दिशा ठरेल, अशी माहिती उपविभगागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)