यवतमाळात अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: October 10, 2015 01:59 IST2015-10-10T01:59:34+5:302015-10-10T01:59:34+5:30
नगरपरिषदेने शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. याची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापासून करण्यात आली.

यवतमाळात अतिक्रमण हटविले
शेड काढले : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टपऱ्या हटविल्या
यवतमाळ : नगरपरिषदेने शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. याची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापासून करण्यात आली. अडीच दिवस चालणाऱ्या या मोहिमेत जाजू चौक ते मुख्य बाजारापेठ परिसरातील दुकांनाचे रस्त्यावर असलेले शेड काढण्यात आले.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी खरमरीत इशारा दिल्यानंतर नगरपरिषदेने पुन्हा अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली. याची सुरूवातच गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चहाटपऱ्या उचलून करण्यात आली. यापूर्वीसुध्दा तीन ते चार वेळा येथील अतिक्रमण काढण्यात आले आहेत. मात्र यावर कायस्वरूपी तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यानंतर पालिका प्रशासनाने शुक्रवारी सकाळपासून जाजू चौक ते मेन लाईन परिसरातील अतिक्रमण काढले. अनेक दिवसांपासून वाद सुरू असलेल्या साडी दुकानाच्या अतिक्रमणावर शेवटी नगरपरिषदेचा बुलडोजर चालला. त्यानंतर आपली काही गय होणार नाही म्हणून इंदिरा गांधी मार्केट परिरातील अनेक बड्या दुकानदारांनी आपले रस्त्यावर आलेले शेड काढण्यास सुरूवात केली. सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती. एकंदर रस्त्यावरच्या २५० टपऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. ही मोहीम शनिवारीसुध्दा राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या अडीच दिवसांच्या मोहिमेत केवळ नगरपरिषद परिरातील काही तुरळक अतिक्रमण काढण्यात आले. तसेच रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या गरीब व्यवसायिकांना हुसकावून लावण्यात आले. ही मोहीम शनिवार होताच परत गुंडाळून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बड्या व्यावसायिकांचे पक्के अतिक्रमण तसेच अबाधीत राहणार आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
या मोहिमेत उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनुप खांडे, नगरपरिषद मुख्याधिकारी सुदाम धुपे, नगरपरिषद कर्मचारी, वडगाव रोड आणि शहर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सहभागी झाले होते. पोलीस बंदोबस्तातच ही मोहीम राबविण्यात आली.
(कार्यालय प्रतिनिधी)