बँकेतील दहा लाखांवरील व्यवहाराची होणार चौकशी
By Admin | Updated: October 24, 2016 01:01 IST2016-10-24T01:01:12+5:302016-10-24T01:01:12+5:30
विधानपरिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी दाखल झाल्यापासून संपूर्ण

बँकेतील दहा लाखांवरील व्यवहाराची होणार चौकशी
आदर्श आचारसंहिता : विधान परिषद निवडणुकीत घडामोडींवर आयोगाचे लक्ष
यवतमाळ : विधानपरिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी दाखल झाल्यापासून संपूर्ण घडामोडींवर आयोगाचे लक्ष राहणार आहे. याबाबत माहिती, तक्रारी करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.
विधान परिषद निवडणुकीत ४४० मतदार आहे. या निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणात प्रलोभने दिली जाण्याची शक्यता आहे. पैसा, जात, धर्माच्या प्रभावातून त्यांना मतदानासाठी बाध्य केले जाऊ शकते. हा प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये एक महिन्याच्या कालावधीत दहा लाखांच्यावर आर्थिक उलाढाल झाल्यास त्याची चौकशी केली जाईल. यासाठी लिड बँक व्यवस्थापक आणि आयकर विभागाची मदत घेतली जाईल, असे सिंग यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीदरम्यान उमेदवार अथवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडे अनधिकृत रोख आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय पोलिसांच्या तपासणी चौकींच्या माध्यमातून संशयितांची झाडाझडती घेतली जाईल. सरसकट तपासणी केली जात नसली, तरी संशय आलेल्या व्यक्तीला तपासण्यात येईल. ही निवडणूक प्रलोभनाशिवाय पार पडावी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. प्रत्येक उमेदवारासोबत पथक राहील. शिवाय गोपनीय यंत्रणेचाही उमेदवार व त्यांच्या निकटवर्तीयांवर वॉच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांनी निर्भीडपणे आणि विवेकाने मतदान करावे. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
संभावित उमेदवारांच्या हालचालींवर आत्ताापासूनच पाळत ठेवली जात आहे. यासंदर्भातील कुठलीही माहिती गोपनीय पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचावी, त्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवली जातील, असे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी सांगितले. नगरपरिषद आणि विधान परिषद निवडणूक काळात दारू विक्रीचा दर आठवड्याला आढावा घेतला जाईल. विक्रीत अतिरिक्त वाढ झाल्यास त्याची विचारणा संबंधित परवानाधारकाला करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी सांगितले. पत्रपरिषदेला निवडणूक उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, आयकर विभागाचे राहुल दीडपाये उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)