जिल्हा क्रीडा कार्यालयातील भ्रष्टाचाराची होणार चौकशी

By Admin | Updated: October 21, 2016 02:14 IST2016-10-21T02:14:49+5:302016-10-21T02:14:49+5:30

२०१५-१६ या वर्षात आयोजित जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या तब्बल २३ लाख रुपयांच्या

The inquiry report of corruption in the District Sports Office | जिल्हा क्रीडा कार्यालयातील भ्रष्टाचाराची होणार चौकशी

जिल्हा क्रीडा कार्यालयातील भ्रष्टाचाराची होणार चौकशी

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : एसीबी चौकशीसाठी क्रीडा संघटना आग्रही
यवतमाळ : २०१५-१६ या वर्षात आयोजित जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या तब्बल २३ लाख रुपयांच्या निधीत जिल्हा क्रीडा कार्यालयाने केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध २५-३० क्रीडा संघटना एकवटल्या आहेत. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना निवेदन देऊन या प्रकरणाची एसीबीकडून चौकशी करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘लोकमत’ने माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे २२ सप्टेंबरपासून ‘पंचनामा शालेय क्रीडा स्पर्धांचा’ या मथळ्याखाली वृत्तमालिका प्रकाशित केली होती. या बातम्यांचा संदर्भ घेऊन विविध क्रीडा संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
गतवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या कर्यकाळात जिल्हा व तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी शासनाकडून २३ लाख रुपयांचा निधी आहे. त्यापैकी १७ लाख ६६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. हा निधी हडपण्यासाठी संयोजकांनी चहा-पाणी, नाश्ता व पंचांच्या मानधनावर थोडे थोडके नव्हे तर लाखोंचे बिल काढले. काही स्पर्धा तर केवळ कागदोपत्रीच घेतल्या. बोगस क्रीडा साहित्य खरेदी, मजुरीच्या नावावर हजारोंची बनावट देयके, बनावट पंचगिरी, खोटे नाव व स्वाक्षऱ्या करून लाखोंचा निधी लाटल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले.
या प्रकाराने क्रीडा क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. खेळाडू व पंचाच्या हक्काच्या व घामाच्या पैशांचाही क्रीडा कार्यालयाने भ्रष्टाचार केला. क्रीडा संघटनांनी याविरुद्ध दाद मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, केवळ स्पर्धा आयोजन या एकाच योजनेत एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असेल तर क्रीडांगण विकास, युवक कल्याण, व्यायामशाळा, पायका आदी अन्य योजनांच्या अनुदान वाटपातही मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्य योजनांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनावर अ‍ॅथलेटिक्स, सॉफ्टबॉल, कबड्डी, कुस्ती, बास्केटबॉल, खो-खो, तलवारबाजी, कॉर्फ बॉल, डॉज बॉल, रस्सी खेच, रोलर स्केटींग, म्युझिकल चेअर, स्पोर्ट्स डान्स, जिल्हा रेफरी बोर्ड, फुटबॉल, कॉन्टी क्रिकेट, हँडबॉल, पॉवर लिफ्टिंग, थ्रो बॉल, फुटबॉल टेनिस, सॉफ्ट टेनिस, कराटे, तेंग शुडो, सिकई मार्शल आर्ट, बास्केटबॉल आदी खेळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे.
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The inquiry report of corruption in the District Sports Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.