‘मेडिकल’च्या स्वीय प्रपंच खात्याची चौकशी
By Admin | Updated: May 1, 2015 01:56 IST2015-05-01T01:56:14+5:302015-05-01T01:56:14+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वीय प्रपंच खात्यात झालेल्या ..

‘मेडिकल’च्या स्वीय प्रपंच खात्याची चौकशी
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वीय प्रपंच खात्यात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने या गैरप्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडून विविध स्वरूपाच्या तपासण्यांसाठी सेवा शुल्क आकारले जाते. ही रक्कम रुग्णालयाच्या स्वीय प्रपंच खात्यात जमा करण्यात येते. ही रक्कम जमा करताना योग्य रकमेच्या पावत्या न फाडता परस्पर खिशात वळती करण्यात आली. या गंभीर प्रकाराला ‘लोकमत’ने वाचा फोडली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने आता दाखल रुग्ण आणि स्वीय प्रपंच खात्यात जमा झालेली रक्कम याची पडताळणी सुरू केली आहे. यासाठी बधीरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. दामोधर पटवर्धन, अधीक्षक डॉ. किशोर इंगोले, डॉ. शरद कुचेवार, कार्यालयीन अधीक्षक वागदरे यांची समिती तयार करण्यात आली आहे.
या समितीकडून स्वीय प्रपंच खात्यात जमा झालेली रक्कम आणि प्रत्यक्ष उपचारासाठी दाखल रुग्ण याची पडताळणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. या समितीने रुग्णालयातून पळून गेलेल्या काही रुग्णांशीही संपर्क करणे आवश्यक आहे. त्यातून आणखी गंभीर बाब पुढे येण्याची शक्यता आहे. आता ही समिती किती पारदर्शकपणे चौकशी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रमाणेच रुग्णालय प्रशासनातील सर्जिकल, किरकोळ भांडार आणि किचनची चौकशी करणे आवश्यक आहे.
याच विभागांमध्ये अनेक वर्षांपासून कर्मचारी ठिय्या मारून आहे. त्यांना तीन वर्षात बदलीचा कायदा लागू आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. अंतर्गत बदलीतही सोईच्या ठिकाणीच नियुक्ती मिळविण्यात येथील कर्मचाऱ्यांचा हातखंड आहे. (कार्यालय प्रतिनिधी)