आरोग्य उपसंचालकांच्या पत्नीची चौकशी
By Admin | Updated: June 5, 2017 01:19 IST2017-06-05T01:19:57+5:302017-06-05T01:19:57+5:30
अकोला येथील आरोग्य उपसंचालकांनी नेत्रतज्ज्ञ पत्नीला येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात प्रतिनियुक्ती दिली.

आरोग्य उपसंचालकांच्या पत्नीची चौकशी
मुख्यमंत्र्यांचे निर्देश : बेकायदा प्रतिनियुक्ती, खासगी प्रॅक्टीस
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अकोला येथील आरोग्य उपसंचालकांनी नेत्रतज्ज्ञ पत्नीला येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात प्रतिनियुक्ती दिली. या काळात पत्नीने शासन आदेशाची पायमल्ली करीत खासगी प्रॅक्टीसही सुरू केली. या गंभीर प्रकाराची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेत आरोग्य संचालकांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे.
आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडकेर यांच्या पत्नी डॉ. शुभांगी अंबाडेकर येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत आहे. त्यांना येथे अकोला येथून प्रतिनियुक्ती देण्यात आली. विशेष म्हणजे आवश्यकता नसताना त्यांना प्रतिनियुक्ती दिली गेली. डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी नंतर चक्क कार्यालयीन वेळेतच आपल्या खासगी दवाखान्यात प्रॅक्टीस सुरू केली. मुख्यालय सोडून नेर या तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा त्यांनी व्यवसाय थाटला.
आयुर्वेदिक महाविद्यालयातसुद्धा त्यांनी कार्यालयीन वेळेत जावून शस्त्रक्रिया केल्या. त्याचे मानधनही उचलले. या सर्व प्रकाराची पुराव्यानिशी स्वाभिमानी संघटनेने तक्रार केली. तथापि आरोग्य उपसंचालकांची पत्नी असल्याने स्थानिक पातळीवर या प्रकरणात कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीची दखल घेत सीएमओ कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी आशा पठाण यांनी थेट आरोग्य संचालकांना चौकशीचे आदेश दिले. नियमांची पायमल्ली करणाऱ्या उपसंचालकांच्या पत्नीविरूद्ध चौकशी अंती कोणती कारवाई होते, की चौकशी दडपली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.