गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीतील गैरप्रकाराची चौकशी
By Admin | Updated: May 9, 2014 01:35 IST2014-05-09T01:19:34+5:302014-05-09T01:35:58+5:30
गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे रबी पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले. शासनाने शेतकऱ्यांसाठी पॅकेजही जाहीर केले.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीतील गैरप्रकाराची चौकशी
दारव्हा : गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे रबी पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले. शासनाने शेतकऱ्यांसाठी पॅकेजही जाहीर केले. मात्र प्रशासनातील काही कर्मचार्यांनी गारपीटग्रस्तांना मदत देताना पंक्तिप्रपंच केल्याची बाब उघड झाली आहे. दारव्हा तालुक्यातही गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतीच्या सर्वेत भ्रष्टाचार झाल्याच्या असंख्य तक्रारी आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महसूल प्रशासन खळबळून जागे झाले. या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला आहे. तहसीलदार सुधीर पाटील यांनी तसे आदेश दिले असून चौकशी करिता अधिकार्यांची टीम तयार करण्यात आली आहे.
गारपिटग्रस्तांच्या मदतीच्या यादीत दारव्हा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. मदतीच्या यादीत ज्यांचे नुकसान झाले त्यांचे नाव नसून ज्यांच्या शेतात रबी पीक नव्हते अशांना मात्र मदत मिळाली आहे. मदतीतील गैरप्रकाराचे अनेक नमुने विविध गावात घडल्यानंतर अन्यायग्रस्त शेतकर्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. आता या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्यामुळे संबंधित कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहे.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात तब्बल आठ दिवस वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा रबी पिकांना बसला. यामध्ये गहू, हरभरा व भाजीपाला पिके नष्ट झाली. खरिपातील अतवृष्टी व रबी पीक गारपिटीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला होता. अशातच नुकसानग्रस्तांना मदत करण्याकरिता नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. शासनाकडून पैसे प्राप्त झाल्यानंतर मदतप्राप्त शेतकर्यांची यादी बँकांकडे पाठविण्यात आली. परंतु प्रत्यक्षात नुकसान झालेल्या काही गावांमध्ये शेतकर्यांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली नव्हती. त्या उलट त्याच गावांमध्ये ज्यांनी रबीची पेरणीसुद्धा केली नाही अशांचा मात्र यादीत समावेश होता. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या शेतकर्यांनी तहसीलदारांकडे तक्रारी करून सर्वेक्षणास जबाबदार असणार्या कृषी सहाय्यक, तलाठी व काही मध्यस्थांवर कारवाई करण्याची मागणी केली. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याकरिता तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, तीन नायब तहसीलदार, तीन मंडळ अधिकारी आदींची नेमणूक करण्यात आली आहे. तक्रारप्राप्त झालेल्या दारव्हा, किन्ही वळगी, पिंपळखुटा, सायखेड, बागवाडी, देऊळगाव, चिखली, कुर्हाड आदी गावातील पिकांच्या सर्वेची चौकशी केल्या जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)