जिल्हा विकासासाठी नावीन्यपूर्ण आराखडा
By Admin | Updated: September 14, 2015 02:37 IST2015-09-14T02:37:45+5:302015-09-14T02:37:45+5:30
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण बाबींच्या संकल्पनेचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

जिल्हा विकासासाठी नावीन्यपूर्ण आराखडा
यवतमाळ : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण बाबींच्या संकल्पनेचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी नवसंकल्पना सूचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे सदर आराखडा केला जात असून यासाठी जिल्हास्तरीय नाविन्यता परिषदेची स्थापनाही करण्यात आली आहे.
या नवसंकल्पनांमध्ये कृषी, फलोत्पादन, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा या मूलभूत बाबींसह दूरसंचार, पणन, जैव तंत्रज्ञान, पर्यावरण, सूक्ष्म तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा तसेच लोककलांचे जतन आदींचा समावेश असणे आवश्यक आहे. यासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठीही नव्या सूचना व संकल्पना स्वीकारण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरील सर्व विभागांकरिता ही परिषद मार्गदर्शक म्हणून एकछत्री भूमिका बजावणार आहे. जिल्ह्यातील गुणवत्ता, कला, उपक्रमशीलता, उद्योगशीलता, नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा प्रभाविपणे वापरास प्रोत्साहन देतील. याशिवाय शाळा, महाविद्यालय, कारखाने, शिक्षण व संशोधन संस्था यांच्यात समन्वय साधून विद्यार्थी, तरूण, बुद्धिजीवी वर्गाला नव्या संकल्पनाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतील.
चांगल्या संकल्पनांना पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, संस्था तसेच यंत्रणांनी आपल्या संकल्पना तथा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकामार्फत जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नावीन्यता परिषदेचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)