कोळसा खाणींबाबत विदर्भावर अन्याय
By Admin | Updated: July 11, 2015 00:09 IST2015-07-11T00:09:50+5:302015-07-11T00:09:50+5:30
विदर्भात वीज निर्मितीसाठी स्थापित एक हजार मेगावॅट क्षमतेचे संच कोळशाअभावी बंद आहे.

कोळसा खाणींबाबत विदर्भावर अन्याय
विदर्भ राज्य : कोळसा खाण कर्नाटकला देण्यास विरोध, लोकप्रतिनिधींचा विदर्भ राज्य समितीने केला निषेध
वणी : विदर्भात वीज निर्मितीसाठी स्थापित एक हजार मेगावॅट क्षमतेचे संच कोळशाअभावी बंद आहे. आता चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राजवळील कोळसा खाण कर्नाटकला देण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांनी लोकसभेत घोषित केले. या निर्णयाचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध केला आहे.
विदर्भातील दोन केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मदतीला भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी चार खासदार असताना या सर्वांनी विदर्भातील जनतेवर अन्याय करणाऱ्या या निर्णयाला उपप्रश्न विचारून निर्णय बदलण्यास का भाग पाडले नाही, असा प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे. विदर्भासह महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा मतदार संघातून गोयल यांना राज्यसभेवर निवडून दिले. ते ऊर्जा व कोळसा मंत्री आहेत. त्यांनी गेल्या २५ मार्चला चंद्रपूरातील ऊर्जा निर्मिती केंद्रापासून ३० किलोमीटर अंतरावरील बरांज कोळसा खाण कर्नाटक पॉवर कंपनीला देऊन विदर्भातील वीज निर्मिती केंद्रावर अन्याय केल्याचा आरोप समितीने केला आहे.
विजेचे दर कमी व्हावे म्हणून वीज केंद्राजवळील कोळसा खाणी राज्य सरकारला वितरीत करण्याचे केंद्राचे धोरण आहे. मात्र त्याला हरताळ फासत केदं्रीय ऊर्जामंत्र्यांनी बरांज कोळसा खाण कर्नाटकला देऊन विदर्भातील वीज निर्मिती केंद्रावर मोठा अन्याय केला आहे. विदर्भाला कमी दरात वीज मिळण्याचा हा मार्गच बंद झाला आहे. राज्यातील खासदार व राज्य सरकारचे म्हणणे विचारात घेतले नाही, असेही पीयुष गोयल यांनी सांगितल्याने विदर्भ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या या लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडल्याचा दावा समितीने केला आहे.
चंद्रपूरातील ऊर्जा निर्मिती केंद्रातील एक हजार मेगावॅटची स्थापित क्षमता असलेले संच क्रमांक आठ व नऊ हे मार्च २०१५ पासून कोळसा पुरवठा होत नसल्याने बंद आहे. उन्हाळ्यात कडक उन्हातही समन्यायी तत्वावर विजेच्या वाटपामुळे विदर्भातील जनतेला सहा ते १२ तासाचे भारनियमन सहन करावे लागते.
आता तर चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील चार संच विविध कारणांमुळे बंद आहेत. यामुळे दोन हजार ३४० मेगावॅट क्षमतेचे हे केंद्र केवळ ७०५ मेगावॅट वीज निर्मिती करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
विदर्भातीलच कोळसा वीज निर्मिती केंद्रांना नाही
विदर्भात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असताना वीज निर्मितीसाठी हा कोळसा विदर्भातील वीज केंद्रांना मिळत नसेल, तर तो विदर्भातील लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा असल्याचे समितीने म्हटले आहे. विशेष म्हणजे विदर्भातील आमदारांनी आपल्या कोट्यातील मते देऊन आपले प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर निवडून दिलेले पियूष गोयल हे त्यांच्याच क्षेत्रातील विदर्भातील जनतेला न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे या लोकप्रतिनिधींचा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अॅड.वामनराव चटप, डॉ.श्रीनिवास खांदेवाले, प्रबिरकुमार चक्रवर्ती, राम नेवले, रमेश गजबे, मधुकर कुकडे, अॅड.नंदा पराते, सरोज काशिकर, मंगल चिंडालीया आदींनी निषेध केला आहे.