कुख्यात सद्दाम वणी पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: June 11, 2017 00:25 IST2017-06-11T00:25:20+5:302017-06-11T00:25:20+5:30
पोलीस दप्तरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असलेला कुख्यात घरफोड्या सय्यद सद्दाम सय्यद उस्मान हा शनिवारी वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

कुख्यात सद्दाम वणी पोलिसांच्या जाळ्यात
सव्वा तीन लाखांचे दागिने जप्त : तेलंगणात सहकाऱ्यासोबत केली होती घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पोलीस दप्तरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असलेला कुख्यात घरफोड्या सय्यद सद्दाम सय्यद उस्मान हा शनिवारी वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याच्याजवळून सव्वा तीन लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. या कारवाईनंतर त्याला तेलंगाणा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. तेलंगाणातील चोरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
तेलंगाणातील अदिलाबाद टाऊन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी शनिवारी अदिलाबाद येथील पोलीस पथक वणीत दाखल झाले होते. यावेळी या पथकाने घरफोडीतील अन्य एक आरोपी मोहम्मद मोहिस मोहम्मद शकील यालाही सोबत आणले होते. या पथकाने वणी पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांना घरफोडीतील अन्य एका आरोपीला अटक करण्यासाठी मदत मागितली. त्यानुसार कुळकर्णी यांनी तपासचक्रे वेगाने फिरवून शहरातील रंगनाथनगर परिसरातील रहिवासी कुख्यात घरफोड्या सय्यद सद्दाम सय्यद उस्मान याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने घरफोडीची कबुली देत चोरीतील १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत तीन लाख रुपये), ५५ तोळे चांदी (किंमत २७ हजार ५०० रुपये) असा एकूण तीन लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हवाली केला. त्यानंतर त्याला मुद्देमालासह अदिलाबाद येथील पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी, डी.बी.पथकाचे सुधीर पांडे, शेख नफीस, सुनिल खंडागळे, दिलीप जाधव यांनी पार पाडली.
आठ महिन्यांपूर्वी कुख्यात सद्दाम याला वणीतील घरफोडीच्या प्रकरणात अटक करण्यात येवून त्याच्याजवळून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. त्याच्यावर अदिलाबाद जिल्ह्यातील जयंत पोलीस ठाण्यात चोरीचे १५ गुन्हे दाखल असल्याने नंतर त्याला जयंत पोलिसांच्या हवाली केले होते.