रेशीम उत्पादकांवर होतोय प्रोत्साहन भत्त्यात अन्याय
By Admin | Updated: October 30, 2015 02:22 IST2015-10-30T02:22:17+5:302015-10-30T02:22:17+5:30
जिल्ह्यात व विदर्भात सध्या रेशीम (तुती) शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे.

रेशीम उत्पादकांवर होतोय प्रोत्साहन भत्त्यात अन्याय
शेतकऱ्यांची मागणी : आंध्र व कर्नाटकात मिळतो इन्सेंटिव्ह
यवतमाळ : जिल्ह्यात व विदर्भात सध्या रेशीम (तुती) शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. कमी खर्चात निश्चित उत्पादन मिळत असल्याने अनेक नवीन शेतकरी तुती लागवड करीत आहेत. शासनाकडून त्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. यासोबतच आंधप्रदेश व कनार्टक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता (इन्सेटिव्ह) मिळावा, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.
यावर्षी रेशीम कोषाचे भाव मागील वर्षाच्या तुलनेत चांगलेच गडगडले आहेत. शासकीय दर हा १६८ रुपये किलोच्या आसपास सुरू आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांचे मुख्य मार्केट असलेल्या रामनगर (कर्नाटक) येथील कोषाचा भाव मंगळवारी कमीतकमी १३० ते जास्तीतजास्त २६५ रुपये (सरासरी २१३) होते. यानंतर हैद्राबाद (आंध्रप्रदेश) हे एक दुसरे मार्केट यवतमाळसाठी जवळचे आहे. या ठिकाणी रामनगरपेक्षा नेहमीच ५० रुपये दर कमी असतो. म्हणजे या ठिकाणी सध्या दोनशे रुपयांच्या आसपास भाव सुरू आहे.
एकीकडे रेशीम शेतीकडे शेतकरी वळत असताना दुसरीकडे भाव जर कोसळत असेल तर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे सहाजिक आहे. आंधप्रदेश व कर्नाटकातील रेशीम शेतकऱ्यांना तेथील सरकारकडून प्रति किलो मागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही ५० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा, अशी शेतकऱ्यांची जुनीच मागणी आहे, परंतु याकडे यापूर्वीच्या सरकारने सतत दुर्लक्ष केले. आता नवीन सरकारने तरी याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी रेशीम शेतकऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)