अंतरंगात सूचकता, प्रतिमा आणि प्रतीकं आवश्यक
By Admin | Updated: January 23, 2015 00:17 IST2015-01-23T00:17:58+5:302015-01-23T00:17:58+5:30
साहित्यातील इतर वाड़मय प्रकारापेक्षा कविता हा वेगळा प्रकार आहे. कवितेला जन्मत: सूचकता, प्रतिमा आणि प्रतिकांचे लेणे घेऊनच साकार व्हावे लागते.

अंतरंगात सूचकता, प्रतिमा आणि प्रतीकं आवश्यक
यवतमाळ : साहित्यातील इतर वाड़मय प्रकारापेक्षा कविता हा वेगळा प्रकार आहे. कवितेला जन्मत: सूचकता, प्रतिमा आणि प्रतिकांचे लेणे घेऊनच साकार व्हावे लागते. काव्यात हे गुण नसतील तर ते निरस, अर्थहिन आणि बेचक झाल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन वऱ्हाडी कवी डॉ. प्रा. विठ्ठल वाघ यांनी केले. ते येथील सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या डॉ.वि.भी. कोलते व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना बोलत होते.
‘कवितेचे अंतरंग’ या विषयावर बोलताना डॉ. विठ्ठल वाघ पुढे म्हणाले, जगातील सर्वाधिक प्रतिभावंत कवयित्री म्हणजे घराघरातील सासू असते. कारण एकही सासू सरळ बोलत नसते, त्यातूनच ‘लेकी बोले, सुने लागे’ हा वाक्प्रचार रुढ झाला. हजार पानांचा इतिहास एका काव्यातून मांडता येतो. एवढे सामर्थ कवितेत आहे. गद्य साहित्याप्रमाणेच कवितेला कुठलाही विषय वर्ज्य नाही. फक्त न पाहिलेले, न अनुभवलेले काहीतरी कवितेत मांडले तर ती कविता हास्यास्पद ठरण्याची शक्यता असते. अवतीभोवतीच्या गोष्टीेचे सुक्ष्म निरीक्षण आणि प्रतिकांचा वापर केल्यास दर्जेदार काव्य निर्मिती होऊ शकते.
विदर्भाच्या माणसाचे वर्णन करताना त्यांनी,
कशी वरून माणसे,
शुभ्र कपाशी सारखी,
खोल मनाच्या तळाशी,
काळी असते सरकी,
या कवितेच्या ओळी सादर केल्या. स्वार्थी माणसांचे वर्णन करताना त्यांनी,
कसा झाला हा माणूस,
कडुनिंबाचा रे पाला,
येल काकडीचा होता,
बार कारल्याचा आला,
या ओळी सादर केल्या. धर्मांध लोकांचा समाचार घेताना त्यांनी,
सोन्याची असते व्दारका,
पोथ्यापुराण सांगत असतात,
ऐकणाऱ्याच्या घरात मात्र,
लाकडाचेही खांब नसतात,
या ओळीतून त्यांनी कवितेचे अनेक अंतरंग उलगडले आणि अनेक किस्से सांगून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी व्यासपीठावर वऱ्हाडी कवी शंकर बडे, प्रा.डॉ. रमाकांत कोलते, प्रा.डॉ. शिल्पा वानखडे उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. शिल्पा वानखडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी प्रा. घनश्याम दरणे, प्रा. नीता शेटे आदींनी परिश्रम घेतले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)