जिल्हा परिषदेसाठी रंगतदार लढतींचे संकेत
By Admin | Updated: January 22, 2017 00:04 IST2017-01-22T00:04:21+5:302017-01-22T00:04:21+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रंगतदार लढतीचे संकेत मिळत आहे.

जिल्हा परिषदेसाठी रंगतदार लढतींचे संकेत
निवडणूक : बसपा, एमआयएम, मनसे, विदर्भवादीही रिंगणात
यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रंगतदार लढतीचे संकेत मिळत आहे. या निवडणुकीत आघाडी होण्याची कुणकुण सुरू असून युती मात्र दुभंगलेलीच राहणार आहे.
जिल्हा परिषदेवरील वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आत्तापर्यंत अपवाद वगळता जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व कायम आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी राज्यस्तरावर भाजपा आणि शिवसेनेत युती होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र या दोन्ही पक्षांनी युतीचे पर्याय स्थानिक स्तरावर बहाल केल्याने ती शक्यता संपुष्टात आली आहे.
युतीची शक्यता दुरावली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून वरिष्ठांच्या अंतिम निर्णयानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची चर्चा आहे.
या आघाडीमुळे भाजप व शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे राहणार आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेत पालकमंत्री पदावरून वितुष्ट झाल्याने भाजपाला ही निवडणूक अत्यंत जड जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांशिवाय मनसे, एमआयएम, बसपा, विदर्भवादी संघटना आदींचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहे. परिणामी ही निवडणूक यावेळी प्रथमच रंगतदार होण्याची शक्यता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास चौरंगी, तर आघाडी न झाल्यास पंचरंगी लढती होण्याचे संकेत आहे. काही ठिकाणी तगडे अपक्षही या पक्षांना जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)
कळंब : भाजपा, काँग्रेस की स्वतंत्र ?
कळंब तालुक्यातील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे दिग्रस तालुक्यातील मातब्बर काँग्रेस पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. राळेगाव तालुक्यात काँग्रेसमध्ये सरळसरळ दोन गट पडले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांच्या गटाने पक्ष मुलाखतींना हजेरी लावल्याने ही बाब उघड झाली. एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत जवळपास सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पक्षांतराला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.