भारताचे ठोस उत्तर : पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ४ बाद ३१९ धावा
By Admin | Updated: November 12, 2016 01:47 IST2016-11-12T01:47:02+5:302016-11-12T01:47:33+5:30
चेतेश्वर पुजाराने घरच्या मैदानावर आकर्षक शतकी खेळी केली. मुरली विजयने देखील आक्रमक आणि बचावात्मक खेळाची झलक दाखवित शतक साजरे करताच भारताने पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडला ठोस उत्तर दिले.

भारताचे ठोस उत्तर : पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ४ बाद ३१९ धावा
राजकोट : चेतेश्वर पुजाराने घरच्या मैदानावर आकर्षक शतकी खेळी केली. मुरली विजयने देखील आक्रमक आणि बचावात्मक खेळाची झलक दाखवित शतक साजरे करताच भारताने पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडला ठोस उत्तर दिले. पाहुण्यांच्या पहिल्या डावातील ५३७ धावांना उत्तर देत तिसऱ्या दिवसअखेर शुक्रवारी ४ बाद ३१९ पर्यंत दमदार मजल गाठली. अखेरच्या चार चेंडंूत भारताने विजय आणि नाईट वॉचमन अमित मिश्रा (००)यांना गमावले.
पुजारा(१२४)आणि विजय(१२६) यांचा खेळ तिसऱ्या दिवसाचे आकर्षण ठरले. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी २०९ धावांची भागीदारी केली. त्याआधी गौतम गंभीर(२९) हा सकाळच्या सत्रात बाद झाला. भारतीय संघ इंग्लंडच्या तुलनेत २१८ धावांनी मागे आहे. पुजाराने २०६ चेंडू टोलवित १७ चौकारांसह १२४, तर विजयने ३०१ चेंडूंत नऊ चौकार आणि ४ षट्कारांसह १२६ धावा ठोकल्या.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या तसेच तिसऱ्या सत्रात श्स्तिबद्ध मारा केला. विराट कोहलीला खाते उघडण्यासाठी संघर्ष करावा लागला. विजयदेखील पुजाराच्या तुलनेत मंदगतीने खेळला, पण संधी मिळताच त्याने मोठे फटके मारले.
विजय कोहलीसोबत १७ षटके खेळपट्टीवर होता, पण दोघांनी केवळ १४ धावा काढल्या. खेळ संपायच्या काही मिनिटाआधी त्याचा संयम सुटला. आदील रशिदच्या गुगलीने त्याचा घात केला. मुरलीचा झेल हसीब अहमदने टिपला.
त्याआधी बिनबाद ६३ वरून सकाळी खेळ सुरू केला. गंभीर एका धावेची भर घालून दिवसाच्या सातव्या चेंडूवर बाद झाला. पुजारा आणि मुरली या दोघांनी पहिल्या सत्रात ९४ आणि दुसऱ्या सत्रात ६८ धावा खेचल्या. पुजाराने ड्राईव्ह, कट तसेच पूलच्या फटक्यांचे अप्रतिम नमुने सादर केले. (वृत्तसंस्था)
ल क्ष वे धी...
01डीआरएसचा पहिला लाभ पुजाराला झाला. तो ८६ धावांवर असताना जफर अन्सारीच्या चेंडूवर पंच ख्रिस गेफेनी यांनी त्याला पायचित दिले. विजयसोबत चर्चा केल्यानंतर पुजाराने रेफ्रल मागितले. बॉल ट्रॅकिंग तंत्रामुळे चेंडू विकेटच्या वरून जात असल्याचे दिसताच पुजारा नाबाद ठरला.
02डीआरएसच्या निर्णयामुळे जीवदान मिळताच पुजाराने चहापानानंतर नव्या चेंडूवर व्होक्सला एक धाव घेत स्वत:चे ९ वे आणि इंग्लंडविरुद्ध तिसरे शतक नोंदविले. स्टेडियममध्ये शतकाचा आनंद साजरा करणाऱ्यांत स्थानिक चाहत्यांशिवाय पुजाराचे वडील आणि पत्नी यांचा देखील समावेश होता.
03तिसऱ्या सत्रात पहिल्याच षटकात विजयला देखील रेफ्रलमधून जीवदान लाभले. त्याने मोईन अली आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना षटकार खेचून सातवे शतक साजरे केले. १६ डावानंतर हे त्याचे पहिले आणि इंग्लंडविरुद्ध दुसरे शतक होते.
04विजयला देखील भाग्याची साथ लाभली. तो ६६ धावांवर असताना कव्हरला क्षेत्ररक्षण करणारा हसीब हमीद त्याचा झेल घेऊ शकला नाही. नंतर मोईन अलीने विजयविरुद्ध रेफ्रल मागितले होते.
इंग्लिश खेळाडूंची शहिदांना श्रद्धांजली!
राजकोट : भारताविरुद्ध पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी इंग्लंड संघाने सीमारेषेबाहर एक मिनिट मौन पाळून युद्धविराम दिवसानिमित्त शहिदांना श्रद्धांजली वाहिली. खेळाडूंनी आज टी शर्टवर अफीमचे फूल लावले होते. पहिल्या विश्वयुद्धात सहयोगी देश आणि जर्मनी यांच्यात फ्रान्समधील कॅम्पिन येथे १९१८ रोजी युद्धविराम करार झाला. तेव्हापासून ११ नोव्हेंबर हा दिवस इंग्लंडमध्ये युद्धविराम दिवस पाळला जातो.
‘दोन बळीमुळे
मनोबल वाढले’
तिसऱ्या दिवसाच्या शेवटी मिळालेल्या दोन बळीमुळे आमचे पारडे जड झाले नसले तरी यामुळे आमचे मनोबल मात्र नक्कीच वाढले आहे. दिवसाच्या शेवटी तुम्हाला दोन बळी मिळाले तर तो नक्कीच बोनस असतो. याचे श्रेय आमच्या गोलंदाजांना आहे, असे मत इंग्लंडचे सहायक प्रशिक्षक पॉल फारब्रास यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, सामन्यात अजूनही खूप वेळ असून आम्हाला संयम ठेवून आपल्या रणनीतीवर अंमलबजावणी केली पाहिजे.
चांगली फलंदाजी झाल्यास जिंकू शकतो
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी अखेरच्या टप्प्यात दोन गडी गमविल्याचे दु:ख नाही. उलट चौथ्या दिवशी चांगली फलंदाजी झाल्यास आम्ही जिंकू शकतो, असा विश्वास शतकवीर चेतेश्वर पुजाराने व्यक्त केला.इंग्लंडच्या ५३७ धावांची बरोबरी झाल्यानंतर झकास फलंदाजी करावी लागेल. काही धावांची आघाडी मिळाली तर आमच्या विजयाची शक्यता राहील, असे खेळ संपल्यानंतर पुजाराने सांगितले. चेंडू वळण घ्यायला लागेल आणि पाचव्या दिवशी धावा काढणे कठीण जाईल, यावर मी भाष्य करणार नाही. माझ्या मते, आम्ही उद्या ७०-८० धावांची आघाडी घेऊ शकल्यास दुसऱ्या डावात पाहुण्या संघाला कोंडीत पकडू शकतो. यासाठी आधी फलंदाजीवर फोकस करावा लागेल, असे पुजाराचे मत होते.
धा व फ ल क
इंग्लंड पहिला डाव : ५३७. भारत पहिला डाव : मुरली विजय झे. हमीद गो. रशिद १२६, गौतम गंभीर पायचित गो. ब्रॉड २९, चेतेश्वर पुजारा झे. कूक गो. स्टोक्स १२४, विराट कोहली नाबाद २६, अमित मिश्रा झे. हमीद गो. अन्सारी ००, अवांतर: १४, एकूण: १०८.३ षटकांत ४ बाद ३१९ धावा. गडी बाद क्रम: १/६८, २-२७७, ३/३१८,४/३१९. गोलंदाजी : ब्रॉड २०-७-५४-३, व्होक्स २३-५-३९-०, मोईन अली २२-६-७०-०,अन्सारी १७.३-१-५७-१, रशिद १६-१-४७-१, स्टोक्स १०-१-३९-१.