महाराष्ट्र दिनी फडकला स्वतंत्र विदर्भाचा ध्वज
By Admin | Updated: May 2, 2015 01:55 IST2015-05-02T01:55:58+5:302015-05-02T01:55:58+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवून खळबळ उडवून दिली.

महाराष्ट्र दिनी फडकला स्वतंत्र विदर्भाचा ध्वज
यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवून खळबळ उडवून दिली. येथील पाचकंदील चौकातील लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. तर कामगार चौकात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले. विदर्भ कृती समित्याच्यावतीने बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध केला.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी यवतमाळात ठिकठिकाणी आंदोलन केले. विदर्भ कनेक्ट (व्ही-कॅन) ग्रुपच्यावतीने पाचकंदील चौकातील स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहण केले. स्वतंत्र विदर्भाचा ध्वज नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती तथा ज्येष्ठ विदर्भवादी नारायण किरपान यांच्या हस्ते फडकाविण्यात आला. यावेळी अॅड.स्मीता सिंगलकर-सरोदे, व्ही-कनेक्टचे अध्यक्ष अॅड. अमोल बोरखडे, अॅड. रवी बदनोरे, जिल्हा किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दासभाई सूचक, अॅड. अजय चमेडिया, अॅड.राजेश चव्हाण, अजय आकोलकर, बाळासाहेब सरोदे, राधाकिसन जाधवाणी, सुजित राय, समीर गावंडे, शाहेद हुसेन सिद्दीकी यांच्यासह शेकडो विदर्भवादी उपस्थित होते. यावेळी अॅड. सिंगलकर यांनी सर्वांकडून प्रतिज्ञा वदवून घेतली.
तसेच विदर्भ राज्य कृती समितीच्या नेतृत्वात यवतमाळच्या बसस्थानक चौकात सकाळी ११ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात नेताजी चौकातून रॅली काढण्यात आली. त्यांनतर बसस्थानक चौकात चक्का जाम केला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सुटका केली. यावेळी माजी आमदार विजयाताई धोटे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, लाला राऊत, प्रकाश पांडे, बाळू निवल, संजय मेश्राम, जयंत बापट, प्रभाकर काळे, पुंडलिक कालापहाड, कृष्णा भोंगाडे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)
सत्तेत येताच मुद्याला बगल
विदर्भाला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. निवडणुकीपूर्वी आता सत्तेवर बसलेल्या केंद्र व राज्य सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत येताच या मुद्याला बगल दिली. यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी विदर्भासाठी घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व विजय निवल यांनी केले. यावेळी प्रकाश पांडे, कृष्णराव भोंगाडे, जयंत बापट, प्रदीप धामणकर, संजय मेश्राम यांच्यासह कामगार उपस्थित होते.