नेरमध्ये ‘प्राप्तिकर’ सर्वे
By Admin | Updated: December 17, 2015 02:25 IST2015-12-17T02:25:36+5:302015-12-17T02:25:36+5:30
शहरातील तीन सराफा प्रतिष्ठानांचा प्राप्तिकर विभागाच्या वर्धा व यवतमाळ येथील संयुक्त पथकाने सर्वे केला.

नेरमध्ये ‘प्राप्तिकर’ सर्वे
सलग २२ तास : तीन सराफा प्रतिष्ठानांची अभिलेखे तपासणी
नेर : शहरातील तीन सराफा प्रतिष्ठानांचा प्राप्तिकर विभागाच्या वर्धा व यवतमाळ येथील संयुक्त पथकाने सर्वे केला. मंगळवारी दुपारी २ वाजता सुरू झालेली ही कारवाई बुधवारी दुपारी १२ वाजता अर्थात सलग २२ तास चालली. वर्धा येथील सहआयुक्त निनावे यांच्या नेतृत्वातील या पथकात १५ सदस्यांचा समावेश होता.
या प्राप्तिकर सर्वेमध्ये नेमके काय ‘विनाकर’ व ‘अतिरिक्त’ सापडले याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही. प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी माध्यमांना काहीही सांगण्यास नकार दिला. येथील सराफ व्यापारी वसंतराव पोहेकर यांचे स्थानिक नेताजी चौक आणि मेन रोड येथे पोहेकर ज्वेलर्स या नावाने दोन सराफा प्रतिष्ठाने आहेत. या दोन प्रतिष्ठानांसह धीरज चंपालाल छल्लाणी यांच्या भारती संस्थानजवळील छल्लाणी ज्वेलर्सचा प्राप्तीकर विभागाने मंगळवारी दुपारी ताबा घेतला. या पथकाने पावती पुस्तके, बँक खाते, दुकानामध्ये उपलब्ध सोने आदी बाबींची तपासणी केली. सोन्याच्या मोजदातीसाठी सायंकाळी ५ वाजता नागपूरवरून व्हॅल्यूअरला बोलाविण्यात आले. तो रात्री १० वाजता पोहोचला. दुकानातील सोने व दागिन्यांची मोजणी करता-करता त्याला पहाटेचे ६ वाजले.
या तीनही सर्वेमध्ये नेमके काय अनधिकृत आढळले, ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे. दरम्यान, वसंतराव पोहेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्राप्तिकर विभागाचा हा रूटीन सर्वे होता. प्राप्तिकर भरणा केला की नाही याची तपासणी करण्यात आली. त्यासाठी दुकानातील अभिलेखे तपासले गेले.
‘प्रभार’ मिळताच धडक मोहीम
प्राप्तिकर विभागाच्या वर्धा व यवतमाळ येथील सहआयुक्त म्हणून सूमन मलीक यांची नेमणूक आहे. मात्र त्या रजेवर असल्याने नागपुरातील आॅडिट विभागाचे सहआयुक्त निनावे यांना अतिरिक्त प्रभार दिला गेला. हा प्रभार मिळताच निनावे यांनी यवतमाळात सर्च-सर्वेची मोहीम सुरू केली. प्राप्तिकरचे महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे आणि कर भरण्याबाबत अन्य व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने हे सर्च-सर्वे अभियान राबविले जात असल्याचे सांगितले जाते. (तालुका प्रतिनिधी)