व्यापाऱ्यांवर आयकर विभागाची नजर
By Admin | Updated: October 22, 2014 23:25 IST2014-10-22T23:25:01+5:302014-10-22T23:25:01+5:30
धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला नागपूर आणि वर्धा येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने यवतमाळात दोन सराफा दुकानांचा सर्च घेतला. या कारवाईला दोन दिवस उलटत नसतानाच बुधवारी

व्यापाऱ्यांवर आयकर विभागाची नजर
यवतमाळ : धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला नागपूर आणि वर्धा येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने यवतमाळात दोन सराफा दुकानांचा सर्च घेतला. या कारवाईला दोन दिवस उलटत नसतानाच बुधवारी आयकर विभागाचा एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचे पथक यवतमाळात येवून गेले. यावेळी त्यांनी आयकर चुकवत असल्याचा संशय असलेल्या काही प्रतिष्ठानांची आणि त्यांच्या घराच्या पत्त्यांची शहानिशा केल्याचे सांगण्यात आले.
सध्या दिवाळीची बाजारात धूम आहे. या कालावधीत व्यवसाय तेजीत असतो. दैनंदिन व्यवसाय कमी दाखवून आयकरची चोरी केली जाते. त्यावर आयकर विभागाची करडी नजर असते.
मात्र व्यावसायिक स्पर्धेतूनही बरेचदा तक्रारी केल्या जातात. बाजारपेठेत गर्दी असल्याची नेमकी संधी साधून आयकर विभागानेही कारवायांचा सपाटा चालविला आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला यवतमाळातील सराफा बाजारात नागपूर आणि वर्धेच्या संयुक्त पथकाने दोन दुकानांचा सर्च घेतला. त्यामध्ये शाह आभूषण आणि शाह ज्वेलर्स या दोन प्रतिष्ठानांचा समावेश होता. आता ही कारवाई झाल्यानंतर पथक इकडे फिरकणार नाही अशी भाबडी आशा व्यावसायिकांना होती. मात्र ऐन सणासुदीच्या काळातही आयकर विभाग कमालीचा सक्रिय आहे. बुधवारी सकाळी एक अधिकारी आणि दोन कर्मचारी यांचे पथक यवतमाळात काही प्रतिष्ठानांच्या पाहणीसाठी आले होते.यावेळी संबंधित व्यावसायिकांची नावे त्यांच्या दुकानांचा आणि घराचा पत्ता याची खातरजमा करण्यात आली. त्यामुळे काही काळ बाजारात विविध चर्चेला उधाण आले होते. आता नंबर कुणाचा अशी धास्ती बहुतांश व्यावसायिकांना आहे.
त्यामुळे ग्राहकांच्या भाऊगर्दीतही एक डोळा व्यावसायिकांना बाहेर ठेवावा लागत आहे. आयकर विभागाने रेकी केल्याने कुठल्याही क्षणी पुन्हा यवतमाळात सर्च होवू शकतो, असे संकेत प्राप्त झाले आहे. या संदर्भात स्थानिक आयकर विभागाशी संपर्क केला असता त्यांनी खासगीत बोलताना त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)