पोटच्या लेकरांना विहिरीत ढकलून महिलेची आत्महत्या, दिग्रस तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:25 IST2019-05-31T21:25:02+5:302019-05-31T21:25:11+5:30
दिग्रस ( यवतमाळ ) : तालुक्यातील मांडवा येथे माहेरी आलेल्या विवाहितेने पोटच्या दोन गोळ्यांना विहिरीत ढकलून स्वत: सुद्धा आत्महत्या ...

पोटच्या लेकरांना विहिरीत ढकलून महिलेची आत्महत्या, दिग्रस तालुक्यातील घटना
दिग्रस (यवतमाळ) : तालुक्यातील मांडवा येथे माहेरी आलेल्या विवाहितेने पोटच्या दोन गोळ्यांना विहिरीत ढकलून स्वत: सुद्धा आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कल्पना अंकुश राठोड (२५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिच्या सोबतच युवराज अंकुश राठोड (५) आणि गुड्डी अंकुश राठोड (३) ही दोन चिमुकलीही मृत पावली आहे. कल्पना राठोड ही मांडवा येथील माहेरवासीन आहे. दारव्हा तालुक्यातील हातनी येथील अंकुश राठोड यांच्याशी तिचा विवाह झाला होता. दोन मुले झाल्यानंतर तिला सासरच्यांनी पैशासाठी त्रास देणे सुरू केल्याचे सांगितले जाते. अशातच काही महिन्यांपूर्वी कल्पनाच्या आईला पैसे मिळाले होते. त्यापैकी काही पैसे घेऊन ये म्हणून सासरच्यांनी तिच्या मागे तगादा लावला होता. याच तगाद्यातून ती माहेरी मांडवा येथे आली होती.
दरम्यान सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून कल्पनाने शुक्रवारी टोकाचे पाऊल उचलले. शुक्रवारी सकाळी मुलगी गुड्डी व मुलगा युवराज या दोघांना घेऊन कल्पना आईच्या घरातून बाहेर पडली. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ती गावालगतच्या गणेश म्हात्रे यांच्या शेतातील विहिरीजवळ पोहोचली. तिने प्रथम दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कल्पनाने स्वत: विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पोलीस पाटील व सरपंच पंकज चव्हाण यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार भगत पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढूृन उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात पतीसह इतरांचा समावेश आहे. दारव्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे पुढील तपास करीत आहे.