शिक्षक आमदारांचे बेमुदत उपोषण

By Admin | Updated: October 19, 2016 00:24 IST2016-10-19T00:24:07+5:302016-10-19T00:24:07+5:30

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे उपोषणाला बसले.

Incessant fasting of teachers' MLAs | शिक्षक आमदारांचे बेमुदत उपोषण

शिक्षक आमदारांचे बेमुदत उपोषण

शिक्षक आघाडी : चर्चा टाळल्याने शिक्षणमंत्र्यांचा निषेध
यवतमाळ : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे उपोषणाला बसले. मात्र, भेटीची वेळ ठरल्यानंतरही शिक्षणमंत्र्यांनी चर्चेला आलेल्या शिष्टमंडळाला ताटकळत ठेवले. याबाबत शिक्षक आघाडी, शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आदींनी निषेध नोंदविला आहे.
१७ आॅक्टोबरपासून अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे तसेच शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर व पुण्याचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ३० आॅगस्ट २०१६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केलेले १४३ कोटी सरसकट २० टक्के अनुदान दिवाळीपूर्वी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच १ व २ जुलै रोजी अनुदानास पात्र ठरलेल्या घोषित शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्यात यावे, १९ सप्टेंबरच्या शासन आदेशातील जाचक अटी रद्द कराव्या, अघोषित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची यादी तत्काळ घोषित करावी, विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या औरंगाबाद येथील मोर्चातील शिक्षकांवर लावलेले ३०७ कलम रद्द करावे, अपंग समावेशित विशेष शिक्षक व परिचर यांच्या बाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या २५ आॅगस्टच्या निर्णयाची अमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी शिक्षक आमदारांनी उपोषण सुरू केले आहे. १७ आॅक्टोबर रोजी उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दुपारी ३ वाजता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे बोलाविण्यात आले होते. त्याप्रमाणे पोलीस वाहनातून ७ जणांचे शिष्टमंडळ ३ वाजता शिक्षणमंत्र्यांच्या भेटीसाठी उपस्थित झाले. मात्र, वेळ ठरलेली असतानाही शिक्षणमंत्री ३.४५ पर्यंत उपलब्ध झाले नाही. शिक्षक आमदारांच्या उपोषणालाही शिक्षणमंत्री महत्त्व न देता कृतीतून अवमान करतात, ही बाब निषेधार्ह असल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या कृतीचा निषेध करण्यात आल्याची माहिती शिक्षक आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अविनाश रोकडे यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Incessant fasting of teachers' MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.