इनामी काटा कुस्त्यांच्या दंगलीचे थाटात उद्घाटन

By Admin | Updated: November 25, 2014 23:03 IST2014-11-25T23:03:42+5:302014-11-25T23:03:42+5:30

स्फुरण चढविणारे हलगी वाद्य व शिवकालीन तुतारीच्या निनादात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐतिहासिक हनुमान आखाड्यात आयोजित

Inauguration of the Threats of the Inami Kata Kuasta | इनामी काटा कुस्त्यांच्या दंगलीचे थाटात उद्घाटन

इनामी काटा कुस्त्यांच्या दंगलीचे थाटात उद्घाटन

यवतमाळ : स्फुरण चढविणारे हलगी वाद्य व शिवकालीन तुतारीच्या निनादात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐतिहासिक हनुमान आखाड्यात आयोजित भव्य इनामी काटा कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन लोकमतचे एडिटर-इन-चिफ तथा माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते कुस्त्यांचे जोड लावून करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कुस्तीगिर संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, प्रताप पारस्कर, दीपक ठाकूर, रामेश्वर यादव, अनिल पांडे, विठ्ठल भोयर, सुरेश जयसिंगपुरे, कुलभूषण तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाबूजींची प्रतिमा व कुस्तीच्या हौदाचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. उद्घाटनीय कुस्ती हनुमान आखाड्याचे मल्ल सागर भोयर विरुद्ध पुसद येथील दिनेश पहेलवान यांच्यात लावण्यात आली. अतिशय चुरशीच्या या लढतीत यवतमाळच्या हनुमान आखाड्याचा मल्ल सागर भोयर (पहेलवान) विजयी झाला. त्याला राजेंद्र दर्डा यांनी ११०० रुपये रोख प्रोत्साहन बक्षिस दिले. तब्बल सात लाख रुपयांची जंगी लयलूट या स्पर्धेत होणार आहे. प्रथम बक्षीस ५१ हजार, द्वितीय ४१ हजार तर तृतीय ३१ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी १२.३० वाजतापासून १००, २००, ४००, ५०० व ७०० रुपये बक्षिसांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. या स्पर्धेत दहा वर्षाच्या चिमुकल्या मल्लांपासून ६७ वर्षाच्या मल्लापर्यंत ४०० ते ५०० मल्लांनी सहभाग नोंदविला आहे. दरवर्षी देशभरातून नामवंत मल्ल येथे हजेरी लावतात. यंदा दिल्ली, जळगाव, नांदेड, हिंगोली, लातूर, अमरावती, कारंजा, अकोला, वाशिम, अंजनगावसुर्जी आदी ठिकाणांहून पहेलवान आले आहेत. या स्पर्धेत कळमनुरी (हिंगोली) येथून आलेला ११ अपत्य असणारा ६७ वर्षीय अब्दुल खय्युम पहेलवान याच्या कुस्तीची प्रेक्षकांना उत्सुकता होती. लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी स्पर्धास्थळी भेट दिली. कुस्त्यांची जोड लावून उपस्थित मल्लांना प्रोत्साहन दिले.दरम्यान कुस्ती खेळातील योगदानाबद्दल जुने नामवंत मल्ल नारायण पचगाडे, मदन चावरे, कांतिलाल जयस्वाल, योगिराज चिकटे, गजानन धलवार, पांडुरंग लांजेवार, सुरेश ठाकरे, रामनाथ यादव, विश्वास काळे, मधुकर धोटे, हिरामण यादव, इसाक पहेलवान, सलिम बेग पहेलवान यांचा जिल्हा कुस्तीगिर संघटनेच्यावतीने शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत जोड लावण्याचे काम गजानन जाधव, उद्धव बाकडे, संदीप नेवारे, किसन दवारे, जितू बन्नावडे, राजू किनाके, सुभाष जुमळे, गणेश तोटे, गौरव पाने यांनी पाहिले. धावते समालोचन अरुण जाधव, नितीन पटले यांनी केले. पंच म्हणून अनिल पांडे, महमद शकील, धनंजय लोखंडे यांनी जबाबदारी सांभाळली. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत १०० ते ७०० रुपयांच्या कुस्त्यांचे १०० ते १२५ कुस्त्यांचे जोड लावण्यात आले. रात्री उशिरापर्यंत एक ते १२ क्रमांकाचे बक्षिस असलेल्या कुस्त्या सुरू होत्या. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of the Threats of the Inami Kata Kuasta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.