विलास गावंडे लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : नळाचे शुद्ध आणि नियिमत पाणी मिळेल या आशेपोटी नागरिकांनी घरी नळ घेतले. परंतु त्यांची पार निराशा झाली. काही भागात पाच दिवसांआड तर सोडा, आठ ते दहा दिवसपर्यंत नळाला पाणी येत नाही. वारंवार केलेल्या तक्रारीचीही दखल घेतली जात नाही. ही समस्या आहे वडगाव परिसरातील जांबरोडवर असलेल्या विद्याविहारसह विविध कॉलनी, सोसायटीतील नागरिकांची.
या परिसराला पाणीपुरवठ्यासाठी बेले ले-आऊटमध्ये नवीनच पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. काही भागाला या टाकीवरून तर काही परिसराला दर्डानगर भागातील टाकीवरून पाणीपुरवठा केला जातो. जवळपास प्रत्येक भागात पाणीपुरवठ्यात अनियमितता आहे. नळाचे दिवस ठरलेले नाहीत. सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही पाणी सोडण्यात येते. काही भागात तर दोन तासही पाणी मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
नळाचे दिवस अधिक असल्याने टाक्या, ड्रम आदी वस्तूंमध्ये पाणी भरून ठेवावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी तर घरात असलेल्या लहान-मोठ्या भांड्यांचा वापर करावा लागतो. किमान तिसऱ्या दिवशी तरी नळ सोडणे अपेक्षित आहे. असे झाले तरच पाण्याची साठवण करण्याची गरज पडणार नाही. या परिसरात असलेली ही समस्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मांडण्यात आली. प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांकडून आश्वासनेच देण्यात आली. परंतु ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काही वसाहतींमध्ये चार दिवसांआड, काही ठिकाणी आठ दिवसांनंतर तर काही भागात दोन-दोन आठवडे पाणी देण्यात येत नाही. हा फरक का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेतील हा दोष आहे. वरिष्ठही गांभीर्याने घेत नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
सात-आठ दिवस पुरवावे लागते पिण्याचे पाणी
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ येत नसल्याने पिण्याचे पाणी सात-आठ दिवस पुरवावे लागते. वडगाव परिसरात असलेल्या जांबरोडवरील विविध नगरातील नागरिकांची ही ओरड आहे.
- रविराजनगर, समतानगर, शारदानगर, तुकडोजीनगर, सीतारामनगरी, बेले ले- आऊट, आकाशनगर, राठोड ले-आऊट, रुद्राक्ष कॉलनी, विद्याविहार नगरी आदी भागातील नागरिकांना या प्रश्नाला तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे, या परिसराला लागूनच बेले ले-आऊटमध्ये पाण्याची टाकी आहे.
"आमच्या रविराजनगरात नियमित पाणी मिळत नाही. नळ सोडले तरी वर चढत नाही. कसेबसे दोन तास नळ राहते. त्यामुळे आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. अशावेळी टँकर घ्यावा लागतो. नळाचा काहीच फायदा होत नाही. आम्ही काय पाण्याचे फक्त बिलच भरत राहायचे का?" - मारोतराव गावराने, रहिवासी
"विद्याविहार कॉलनीमध्ये नळाचे पाणी दोन-दोन आठवडे येत नाही. आले तरी धार अतिशय कमी असते. परिसरातील नागरिकांनी व्यवस्था केलेल्या स्रोतांवरून पाणी मिळत असल्याने तीव्रता जाणवत नाही. मात्र, प्राधिकरणाने नियमित पाणीपुरवठा करावा. केवळ पाण्याचे बिल देऊन मोकळे होऊ नये." - भुमन्ना बोमकंटीवार, रहिवासी