अमृत योजनेच्या कार्यक्षेत्रात सुधारणा
By Admin | Updated: December 2, 2015 02:41 IST2015-12-02T02:41:04+5:302015-12-02T02:41:04+5:30
अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजनेचे कार्यक्षेत्रात सुधारणा करण्यात आली आहे.

अमृत योजनेच्या कार्यक्षेत्रात सुधारणा
प्रभावी अंमलबजावणी : गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना चौरस आहार
यवतमाळ : अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजनेचे कार्यक्षेत्रात सुधारणा करण्यात आली आहे. जेणेकरून अंगणवाडी क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांनाही चौरस आहाराचा पुरवठा केल्या जाऊ शकेल.
अमृत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास सचिव यांच्या अध्यक्षतेत नागपूर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आदिवासी विकासचे अपर आयुक्त यांनी असे निदर्शनास आणून दिले की, शासन निर्णयानुसार योजनेचे कार्यक्षेत्र अनुसूचित क्षेत्रातील ८५ एकात्मिक बाल विकास प्रकल्प घेतल्यामुळे त्या कार्यक्षेत्रात काही अनुसूचित क्षेत्राबाहेरील गावांचा समावेश आहे. तर काही अनुसूचित क्षेत्रातील गावांचा समावेश होत नाही. त्यामुळे अंगणवाडी क्षेत्रातील गरोदर स्त्रीया व स्तनदा माता लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची तीव्र शक्यता होती.
त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेत २४ डिसेंबर २०१५ रोजी झालेल्या बैठकीतसुद्धा याबाबत चर्चा झाली. ही संपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेता अनुसूचित क्षेत्रातील सोळा जिल्ह्यांमधील ८५ एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यक्षेत्रासह मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्र (अनुसूचित क्षेत्र) व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्राचाही यामध्ये समावेश करण्यास शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ३० नोव्हेंबरच्या शुद्धीपत्रकाद्वारा मान्यता दिली आहे. त्यामुळे ही योजना अधिक प्रभावी झाली आहे. या योजनेची योग्य अंमलबजावणी होणे आता गरजेचे आहे. (प्रतिनिधी)