संचमान्यता सुधारल्या

By Admin | Updated: November 11, 2014 22:49 IST2014-11-11T22:49:19+5:302014-11-11T22:49:19+5:30

जिल्ह्यातील अनुदानित व विना अनुदानित माध्यमिक शाळांच्या सन २०१३-१४ च्या संचमान्यता अखेर सुधारणा करून शनिवारी शाळांच्या हवाली करण्यात आल्या. या संचमान्यता बऱ्याचशा प्रमाणात

Improved permissions | संचमान्यता सुधारल्या

संचमान्यता सुधारल्या

वणी : जिल्ह्यातील अनुदानित व विना अनुदानित माध्यमिक शाळांच्या सन २०१३-१४ च्या संचमान्यता अखेर सुधारणा करून शनिवारी शाळांच्या हवाली करण्यात आल्या. या संचमान्यता बऱ्याचशा प्रमाणात निर्दोष असून त्यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या कमी करण्यात आल्याचे समजते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे नवीन आकृतिबंधानुसार ठरविण्यात आली असून प्रयोगशाळा परिचर व नाईक ही पदे व्यपगत करण्यात आली आहे. त्यामुळे लहान शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे अतिरिक्त ठरली आहे.
गेल्या वर्षभरापासून माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे ठरवून देण्यासाठी संचमान्यतेचे काम कितीदा तरी हाती घेतले. शिक्षकांची पदे ‘शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९’ नुसार व शिक्षकेतरांची पदे नव्या आकृतिबंधानुसार ठरवून देण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे होते. त्यासाठी शाळांकडून मागील वर्षी तीन वेळा प्रस्ताव मागितले गेले होते. त्यावरून दोन वेळा संचमान्यताही तयार करण्यात आल्या. मात्र त्या दोन्ही वेळा सदोषच ठरल्या. शिक्षकेतरांची पदे नव्या आकृतीबंधानुसार न देता जुन्याप्रमाणेच कायम ठेवण्यात आली होती.
नवे शिक्षणाधिकारी वंजारी रूजू होताच त्यांनी पुन्हा नव्याने संचमान्यतेचे काम हाती घेतले व अतिशिघ्र गतीने संचमान्यता तयार करून शाळांना वितरीत केल्या. आता अतिरिक्त शिक्षकांची संख्या केवळ १५५ पर्यंत आणण्यात आली. मात्र नव्या आकृतिबंधामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहे. प्रयोगशाळा परीचर व नाईक ही पदे व्यपगत करून सर्व पदांना ‘चतुर्थ श्रेणी कर्मचारी’ असे नाव देण्यात आले आहे. आता ५०० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना वरिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहायक व अर्धवेळ ग्रंथपाल ही जादा पदे देण्यात आली. यामुळे जिल्हाभरात ५०० पेक्षा अधिक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. मात्र अशा अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांचे वेतन कार्यरत शाळेतूनच शालार्थ प्रणालीद्वारे काढण्यास सांगण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती १५ दिवसात शिक्षणाधिकारी यांना सादर करावयाची आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीत न काढता ‘आॅफ लाईन’ काढावयाचे आहे. अतिरिक्त ठरलेले शिक्षक शिक्षण सेवक असतील, तर त्यांच्या सेवा तत्काळ समाप्त करण्याच्या लेखी सूचना संच मान्यतेसोबतच देण्यात आल्या आहेत. सन २०१४-१५ या चालू शैक्षणिक सत्राच्या संचमान्यता कधी होणार, हे मात्र अद्याप अनिश्चित आहे.
यावर्षीच्या संचमान्यतेमध्ये पुन्हा शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे काही शाळांमध्ये बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीची संचमान्यता मिळाल्यानंतरच समायोजन प्रक्रिया राबविल्यास उचित होणार असल्याचे बोलले जाते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Improved permissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.