प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना कारावास
By Admin | Updated: November 1, 2015 02:52 IST2015-11-01T02:52:41+5:302015-11-01T02:52:41+5:30
येथील मोठे वडगाव परिसरात पूर्व वैमनस्यातून तिघांनी एकावर चाकूहल्ला केला.

प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना कारावास
प्रकरण वडगावचे : १० साक्षीदार तपासले
यवतमाळ : येथील मोठे वडगाव परिसरात पूर्व वैमनस्यातून तिघांनी एकावर चाकूहल्ला केला. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.टी. वानखडे यांनी मुख्य आरोपीला पाच वर्ष व इतर दोन आरोपींना प्रत्येकी दोन वर्ष कारावासाची शिक्षा शनिवारी ठोठावली.
अजय पंजाबराव महल्ले (२१), जिजाबाई पंजाबराव महल्ले आणि अण्णा नामदेव वऱ्हाडे (४५) रा.शांतीनगर, मोठे वडगाव असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे. या आरोपींनी रूपेश नरेश तंटक याच्यावर ५ जून २०१२ रोजी रात्री ८.३० वाजता धर्माजीनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून हल्ला केला.
अण्णा वऱ्हाडे आणि जिजाबाई महल्ले यांनी रूपेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अजय महल्ले याने रूपेशवर चाकूने सपासप वार केले. यात त्याच्या डोक्याला, गळ्याला, हाताच्या पंजाला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. रूपेश सलग १६ दिवस रुग्णालयात दाखल होता.
या प्रकरणी पुष्पा नरेश तंटक यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात वडगाव रोड पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक विजय राठोड, उपनिरीक्षक ए.जी. पठाण यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात जखमी रूपेशसह एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. यावरून आरोपी अजय महल्ले याला पाच वर्षाची शिक्षा तर उर्वरित दोन आरोपींना प्रत्येक दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली.
शिवाय आरोपींना करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेतून पाच हजार रुपये नुकसान भरपाई जखमीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता संदीप दर्डा यांनी तर बचाव पक्षातर्फे अॅड.सतीश तत्त्ववादी यांनी युक्तिवाद केला.
(कार्यालय प्रतिनिधी)