धडक सिंचन विहिरींना तातडीने वीज जोडणी
By Admin | Updated: October 7, 2015 03:03 IST2015-10-07T03:03:09+5:302015-10-07T03:03:09+5:30
वीज जोडणी नसल्याने अनेक कृषीपंपधारक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ओरडही वाढली आहे.

धडक सिंचन विहिरींना तातडीने वीज जोडणी
बैठक : वीज वितरण कंपनीला निर्देश
यवतमाळ : वीज जोडणी नसल्याने अनेक कृषीपंपधारक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ओरडही वाढली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना तातडीने वीज जोडणी देता यावी म्हणून शासनाने जिल्ह्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी विशेष निधीही मिळणार आहे. वीज कंपनीने शेतकऱ्यांच्या प्रलंबित सर्व विहिरींना तातडीने जोडणीचे नियोजन करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
महसूल भवन येथे कृषीपंप जोडणीचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीला वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, रोहयो उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वद्देवार आदी उपस्थित होते.
वीज जोडणीच्या कामाला गती देण्यासाठी जोडणीचा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्यात १५ ठिकाणी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम सुरु आहे. या कामासह जी विविध कामे कंत्राटदारांकडून जिल्ह्यात सुरु आहे, अशा कंत्राटदारांना कामास गती देण्याच्या अनुषंगाने वारंवार निर्देश दिले जावे. शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या बाबींचा पाठपुरावा करण्याचा सूचनाही त्यांनी केल्या.
धडक सिंचन योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या विहिरींनाही प्राधान्याने वीज जोडणी द्यावयाचे आहे. त्यासाठी पूर्ण विहिरींची यादी प्राप्त करून घेण्यात यावी व त्या शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज घेऊन तातडीने या विहिरींचा वीज जोडण्या पूर्ण कराव्या, असे यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. या आढावा बैठकीमध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास योजना तसेच पायाभूत सुविधा आराखडा योजनेंतर्गत सुरु असलेल्या वीज विकासाच्या कामांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.
(स्थानिक प्रतिनिधी)