यवतमाळ शहराला दररोज पाण्यासाठी तातडीने निधी

By Admin | Updated: July 27, 2014 00:19 IST2014-07-27T00:19:23+5:302014-07-27T00:19:23+5:30

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या यवतमाळ शहराला दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे सांगून सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित असलेला निधी तातडीने दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

Immediate funding for water to Yavatmal in the city | यवतमाळ शहराला दररोज पाण्यासाठी तातडीने निधी

यवतमाळ शहराला दररोज पाण्यासाठी तातडीने निधी

यवतमाळ : जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या यवतमाळ शहराला दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे सांगून सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित असलेला निधी तातडीने दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात झालेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
ज्या भागात फ्लोराईडयुक्त पाणी आहे तेथे पाणीपुरवठा योजना राबविताना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विकासासाठी जिल्हा नियोजन समितीला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. गेल्या वर्षात विकास आराखड्यास चांगली वाढ देण्यात आली आहे. दिलेला निधी अखर्चित राहणार नाही, यासाठी यंत्रणेने नियोजन करून काम करावे, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या.
जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांचे काम अर्धवट झाले. बांधकामासाठी शासनाने मुदतवाढ दिल्यास ही कामे तातडीने पूर्ण होऊ शकतील. त्यामुळे मुदतवाढीसह सात कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना. पवार यांनी या वेळी दिली. पुराचा फटका बसत असलेल्या गावात उपययोजनांसाठी पूरनियंत्रण सर्व्हे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अतिवृष्टीत शेतात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कमीतकमी ७०० रुपये देण्याची तरतूद करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
या वेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, अतिवृष्टीग्रस्तांना निधी वाटप आदी बाबींची माहिती सादर केली. या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, आमदार वामनराव कासावार, संजय राठोड, संदीप बाजोरिया, ख्वाजा बेग, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, उपाध्यक्ष ययाती नाईक, नगराध्यक्ष सुभाष राय, आयुक्त डी.आर. बन्सोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर जिल्हाधिकारी ज्ञानेश भट, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Immediate funding for water to Yavatmal in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.