संशयिताकडेच अवैध वृक्षतोडीची चौकशी !

By Admin | Updated: October 21, 2015 02:53 IST2015-10-21T02:53:19+5:302015-10-21T02:53:19+5:30

ज्या यवतमाळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात लाखो रुपयांच्या सागवानाची अवैधरीत्या कत्तल झाली,

Illegal tree inquiry! | संशयिताकडेच अवैध वृक्षतोडीची चौकशी !

संशयिताकडेच अवैध वृक्षतोडीची चौकशी !

लपवाछपवी उघड : फेरचौकशीचे आदेश
यवतमाळ : ज्या यवतमाळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात लाखो रुपयांच्या सागवानाची अवैधरीत्या कत्तल झाली, त्याच अधिकाऱ्याकडे याची चौकशी सोपविली गेल्याने मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
पांढरकवडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने सागवानाचा ट्रक पकडला होता. त्यातून सुमारे सहा लाखांचे सागवान जप्त केले गेले. याप्रकरणी चालक-वाहक तसेच हिवरीतील दलाल व दोन मजूर अशा पाच जणांना अटक केली गेली. यातील म्होरक्या शेख चांद (यवतमाळ) मात्र वनखात्याला हुलकावण्या देतोय. चौकशी दरम्यान जप्त केलेले लाकूड हे यवतमाळ वनपरिक्षेत्रांतर्गत पिंपरी जंगलातील असल्याचे निष्पन्न झाले. तेथील भोगवटदार-२ तथा महसुली जमिनीतील ही वृक्षतोड असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष झाडांची कटाई करणाऱ्या मजुरांनीही पिंपरीतील तो स्पॉट दाखविला. पांढरकवडा येथील सहायक वनसंरक्षक नंदकिशोर जगताप यांच्याकडे ही चौकशी सोपविली असली तरी ते आपली चौकशी ट्रकमधील जप्त मालापर्यंतच मर्यादित ठेवत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उर्वरित वृक्ष कटाईचे काय, असा प्रश्न पुढे आला. कारण याप्रकरणातील चालकाने आपण यापूर्वी पाच ट्रक सागवान आंध्र प्रदेशात नेल्याची कबुली पांढरकवडा आरएफओला बयाणात दिली होती. शिवाय यवतमाळ आरएफओंनी सुमारे दोन ट्रक सागवान जोडमोहा डेपोत कोणत्याही पंचनामा व पीओआर शिवाय परस्परच जमा केले. त्यामुळे हे एकूण सात ट्रक सागवान नेमके कुठून आले याचे गूढ कायम आहे. पिंपरी, चिचबर्डी, वाघापूर, लासीना या जंगलात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड झाली आहे. यवतमाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांनी आपली चौकशी पिंपरीतील जंगलातच संपविण्याचा प्रयत्न चालविला. त्यांनी केलेल्या चौकशीत लपवाछपवी होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी त्यांना फेरचौकशीचे आदेश दिले. मात्र ज्यांच्या कार्यक्षेत्रात लाखो रुपयांची अवैध वृक्षतोड झाली, तो अधिकारी किती प्रामाणिकपणे ही वृक्षतोड रेकॉर्डवर दाखवेल याबाबत साशंकता आहे. आरएफओ मडावींच्याच हद्दीतील जंगलात वृक्षतोड झाली असताना मुख्य वनसंरक्षकांनी त्यांच्याचकडे ही चौकशी सोपविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

‘सीसीएफ’ पोहोचले सावळीच्या जंगलात
सावळीसदोबा : येथील घनदाट जंगलात तब्बल १५० परिपक्व सागवान वृक्षांची आठवडाभरापूर्वी अवैध कत्तल करून ते मराठवाड्यात पाठविले गेले. वनविभागाने माहूर वनपरिक्षेत्रात दोन दिवसांपूर्वी भल्या मोठ्या ताफ्यासह भल्या पहाटे धाड घातली होती. तेव्हा अवघ्या २६ हजारांच्या रिपा त्यांच्या हाती लागल्या. मात्र या जप्तीलाच ‘कामगिरी’ दाखविण्याचाही प्रयत्न झाला. या वृक्षतोडीची दखल घेऊन यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) व्ही.व्ही. गुरमे मंगळवारी सावळीसदोबाच्या जंगलात पोहोचले. त्यांनी तेथे वृक्षतोड व त्याच्या थुटांची पाहणी केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी मंगळवारी मराठवाड्यातील वडसा (पडसा) येथे धाड टाकून सागवान जप्त केले. माळेगाव, दातोडी, वरूड (तुका) जंगलातील परिवक्व सागवान कत्तलीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. माळेगाव, दातोडी, वरूड (तु) ही गावे मराठवाडा सीमेवर आहे. या जंगलातील वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.एच. जाधव कार्यरत आहे. यानंतरही पैनगंगा नदीतून लाकूड चोरी होत आहे. यवतमाळ आणि पांढरकवडा येथील मोबाईल स्कॉड आठवडाभरापासून येथे ठाण मांडून आहे. बीट दरोगा बालाजी चव्हाण आणि वनरक्षक बांगर हे या बीटमध्ये कार्यरत आहे. चौकशीअंती कुणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Illegal tree inquiry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.