अवैध वाहतुकीचा उसळला आगडोंब
By Admin | Updated: December 6, 2014 02:04 IST2014-12-06T02:04:51+5:302014-12-06T02:04:51+5:30
वणी विधानसभा क्षेत्रात अवैध प्रवासी वाहतुकीचा ‘आगडोंब’ उसळला आहे. पाचही पोलीस ठाण्यांतर्गत अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत आला आहे.

अवैध वाहतुकीचा उसळला आगडोंब
रवींद्र चांदेकर वणी
वणी विधानसभा क्षेत्रात अवैध प्रवासी वाहतुकीचा ‘आगडोंब’ उसळला आहे. पाचही पोलीस ठाण्यांतर्गत अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत आला आहे. मात्र स्वतंत्र वाहतूक शाखा निर्माण करूनही त्यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना अपयश येत आहे. अवैध वाहतूकदार मुजोर झाल्याने अनेकदा हाणामारीच्या घटना घडत आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात वणीसह मारेगाव, पाटण, मुकुटबन आणि शिरपूर ही पाच पोलीस ठाणी आहेत. वणीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. पूर्वी या पोलीस ठाण्यांतर्गतच वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जात होते. मात्र दीड वर्षांपूर्वी जिल्ह्यात स्वतंत्र वाहतूक पोलीस विभाग निर्माण झाला. वणीत वाहतूक शाखा वेगळी झाली. या शाखेसाठी खास सहायक पोलीस निरीक्षकांची नेमणूक केली गेली. त्यांच्यासाठी येथे स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात आले. मात्र स्वतंत्र वाहतूक शाखा निर्माण करूनही अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरूच आहे.
वणी शहरात ठिकठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणारे आॅटो कुणाच्याही नजरेस पडतात. अगदी बसस्थानकासमोर आॅटोंची गर्दी दिसून येते. बसस्थानकासमोरच आॅटोचालक ‘चलो मारेगाव, राजूर, नांदेपेरा’ म्हणून मोठ्याने ओरडत असतात. मात्र त्यांचा आवाज कधीच वाहतूक पोलिसाला ऐकू जात नाही. बसस्थानकातून प्रवासी निघताच हे आॅटो चालक त्यांच्या पाठीमागे लागतात. प्रवासी आपल्या आॅटोत बसविण्यासाठी त्यांची चढाओढ सुरू असते. टिळक चौकात तर अवैध प्रवासी वाहतूकदारांनी अक्षरश: हैदोस मांडला आहे. तेथे अत्यंत दाटीवाटीने वाहने उभी राहतात. प्रवासी भरण्यावरून त्यांच्यात वाद होतात. वादाचे पर्यवसान हाणमारीतही होते. तरीही वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेऊन असतात. याच ठिकाणी नागपूर, वरोराकाडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सही उभ्या राहतात. त्यातही भरदिवसा प्रवासी भरले जातात. मात्र तरीही कारवाई होताना दिसत नाही. दीपक टॉकिज परिसर, बसस्थानक, टिळक चौक आदी ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने ठिय्या देऊन असतात. मात्र वाहतूक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होते.
हिच परिस्थिती मारेगाव शहरातही आहे. वणीकडून यवतमाकळडे जाणाऱ्या मार्गावर एका रांगेत तेथे आॅटो उभे दिसतात. हे आॅटो रस्त्यावरच लावले जातात. त्यामुळे महामंडळाची बस थांबण्यासाठीही तेथे जागा उरत नाही. आधीच प्रवासी निवारा नसल्याने तेथे प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. त्यातच आॅटो चालक प्रवासी मिळविण्यासाठी धडपड करतात. त्यातून मारेगावात एखादवेळी मोठा अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे.
मारेगावचे वाहतूक पोलीस अनेकदा तेथे उभे दिसतात. मात्र ते अवैध प्रवासी वाहतुकीविरूद्ध कारवाई करताना दिसत नाही. केवळ पांढरा आणि खाकी पोशाख घालून ते बसस्थानक परिसरात मिरवितात. त्यांच्या डोळ्यादेखत आॅटोत प्रवासी कोंबले जात असताना ते मूकदर्शक बनून तेथे वावरतात. त्यामुळे पोलिसांचे अवैध प्रवासी वाहतूकदारांशी ‘साटेलोटे’, तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडतो.
मुकुटबन ठाण्याअंतर्गतही अवैध प्रवासी वाहतूक सुरूच आहे. मुकुटबन ते झरी, मुकुटबन ते पाटण, मुकुटबन ते वणी या मार्गावर अनेक अवैध प्रवासी वाहने धावतात. त्यांच्यावर तुरळक प्रमाणात कारवाई होते. आता या ठाण्यात वाहतूक विभागात नवीन कर्मचारी दाखल झाले आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतदारांवर ‘वचक’ निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र हा ‘वचक’ केवळ नावापुरताच असून त्यामागे भलतेच कारण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतुकीला मात्र अद्याप ‘चाप’ लागला नाही. नवीन वाहतूक पोलीस यापूर्वी वणीतही आपली ‘कामगिरी’ बजावून गेले आहे, हे विशेष.
पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतीही हिच स्थिती कायम आहे. पाटण येथून झरीजामणी, मुकुटबन, बोरीकडे दररोज प्रवासी भरून वाहने धावतात. अक्षरश: प्रवाशांना वाहनांमध्ये कोंबून नेले जाते. मात्र वाहतूक पोलिसांना त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसते. प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. पर्याय नसल्याने अनेकांना या अवैध प्रवासी वाहनांनी प्रवास करावा लागतो. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूकदारांची मुजोरी चांगलीच वाढली आहे.
शिरपूर ठाण्याअंतर्गतही अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र या ठाण्याने बऱ्यापैकी त्यावर नियंत्रण ठेवले आहे. हे पोलीस ठाणे संवेदनशील आहे. अनेक कोळसा खाणी या ठाण्याच्या हद्दीत येतात. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये अनेकदा वादही घडतात. तथापि अवैध प्रवासी वाहतूकदारांमध्ये क्वचित वाद होतात.