अवैध प्रवासी वाहतुकीत अप्रशिक्षित चालक
By Admin | Updated: September 30, 2016 02:54 IST2016-09-30T02:54:40+5:302016-09-30T02:54:40+5:30
तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली असून महिना दीड महिना वाहक असलेला तरुण चक्क काही दिवसातच चालक म्हणून भरधाव वेगाने

अवैध प्रवासी वाहतुकीत अप्रशिक्षित चालक
अपघाताची भीती : आरटीओचे दुर्लक्ष
उमरखेड : तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली असून महिना दीड महिना वाहक असलेला तरुण चक्क काही दिवसातच चालक म्हणून भरधाव वेगाने वाहन हाकताना दिसत आहे. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे.
उमरखेड येथे ग्रामीण भागातून येथे येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. एसटी बस अपुरी पडत असल्याने नागरिक खासगी वाहनांचाच आधार घेतात. त्यामुळे तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. शेकडो वाहनातून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यात आॅटोरिक्षा, जीप, मिनीडोअर, काळी पिवळी या वाहनांचा समावेश आहे. या सर्व प्रकारातील धोकादायक बाब म्हणजे अप्रशिक्षित वाहन चालक होय. काही दिवस वाहनांवर वाहक म्हणून काम करणारे तरुण चक्क स्टेअरिंगचा ताबा मिळवितात. भरधाव वाहने चालवितात. कोणताही परवाना नसताना ही मंडळी बिनधास्तपणे चालक म्हणून वावरताना दिसतात. वाहनात बसायलाही जागा नसते. चालकही छोट्याशा जागेत बसून वाहन चालवितो. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. पोलीस आणि परिवहन विभागाचे अधिकारी या प्रकाराला आळा घालण्यासाठी कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. (शहर प्रतिनिधी)