सागवान अवैध कत्तलीतील वनपालास अभय
By Admin | Updated: August 30, 2014 02:09 IST2014-08-30T02:09:37+5:302014-08-30T02:09:37+5:30
येथील वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दहेगाव बीटमध्ये झालेल्या अवैध सागवान कत्तलीचा ठपका तीन कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला.

सागवान अवैध कत्तलीतील वनपालास अभय
घाटंजी : येथील वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दहेगाव बीटमध्ये झालेल्या अवैध सागवान कत्तलीचा ठपका तीन कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला. मात्र दोघांवरच निलंबनाची कारवाई झाली. यातील वनक्षेत्र सहायकाला अभय देत पद्धतशिरपणे कारवाईतून वगळण्यात आले आहे. याची तक्रार मुख्य वनसंरक्षकांकडे एका निवेदनातून करण्यात आली.
दहेगाव बिटमध्ये अवैध सागवान तोड झाल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली. त्यांचे आदेशानुसार संरक्षण व अतिक्रमण निर्मूलनचे वनपाल एस.जी. लाभसेटवार यांनी कक्ष क्र.२५०, २४६, २५१ मध्ये पाहणी केली असता त्यांना अवैध थुटाचे वनरक्षकांनी ड्रेसिंग केलेले आढळले. (परवानगी न घेता उंच थुटे तोडून कापण्यात आली, सात थुटाची भेंडी करण्यात आली. १४ थुटे वनरक्षकाने अवैध तोड झालेल्या मालाची चौकशी करून कोणत्याही प्रकारचा माल हस्तगत करण्याचा प्रयत्न केला नाही. बिट वनरक्षक व वनमजूर यांनी बिट संरक्षणाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. तसेच क्षेत्र सहाय्यक यांनीसुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. असा या तिघांवर ठपका ठेवीत अहवाल वरिष्ठांना पाठविला. त्या अहवालावरून केवळ वनमजूर व वनरक्षक यांचेवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले. मात्र चौकशी अहवालामध्ये समप्रमाणात ठपका असलेल्या वनक्षेत्र सहाय्यकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यांचेवरसुद्धा कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनकर मानकर यांनी मुख्य वनसंरक्षक यांचेकडे एका निवेदनातून केली आहे. येथे बोटावर मोजण्याइतक्या थुटावरून दोघांना निलंबित केल्या जाते. तर अनेक ठिकाणी सागवानाची मोठी कत्तल होते. त्यांचेवरसुद्धा वन विभागाने कडक कारवाई करावी, अशी जनमानसात मागणी आहे.
(तालुका प्रतिनिधी)