थार येथील गावकऱ्यांनीच पकडली अवैध रेती
By Admin | Updated: September 4, 2015 02:32 IST2015-09-04T02:32:25+5:302015-09-04T02:32:25+5:30
महागाव तहसील अंतर्गत संगम रेती घाटावरील अवैध रेती उपसा थार (बु) येथील गावकऱ्यांच्या सतर्कतेने गुरुवारी उजेडात आला.

थार येथील गावकऱ्यांनीच पकडली अवैध रेती
प्रशासन अद्यापही झोपेतच : नऊ ट्रक, एक ट्रॅक्टर असताना केवळ तीनच वाहनांवर कारवाई
हिवरासंगम : महागाव तहसील अंतर्गत संगम रेती घाटावरील अवैध रेती उपसा थार (बु) येथील गावकऱ्यांच्या सतर्कतेने गुरुवारी उजेडात आला. मात्र, घाटावर ९ ट्रक व १ ट्रॅक्टर असतानाही कारवाई केवळ तीनच वाहनांवर केली गेली. काही दिवसांपासून २० ते २५ ट्रक व ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेती तस्करी चालू असतानाही महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत होते, हे विशेष.
संगम रेती घाट हिवरासंगम येथून हाकेच्या अंतरावर असला तरी घाटावर जाण्यासाठी थार (बु) ते संगम असे दीड किलोमीटरचे अंतर कच्चा रस्ता आहे. सदर रेती घाटाच्या लिलावाची मुदत संपण्यासाठी काही दिवस शिल्लक आहे. पावसाळ्यात पाण्यामुळे घाटावर नवीन रेती मोठ्या प्रमाणात जमा झाली. त्यामुळे कंत्राटदाराने या शिल्लक कालावधीत रात्रन्दिवस रेती उपसणे सुरु केले. मात्र, जागरुक थारवासीयांनी गुरुवारी सकाळी साडेसात वाजेपासूनच रहदारीच्या रस्त्यावर ठाण मांडून रेती वाहतूक करणारी वाहने अडविली. मात्र, तीन ट्रक वगळता इतर उर्वरित वाहनांनी रेती घाटावरच वाहने रिकामी करुन गाड्या घाटावरुन बाजूला नेऊन उभे केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार की नाही? हा संभ्रम आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र भारती यांनी तहसील प्रशासनाला फोन करुन माहिती दिल्यानंतर केवळ एक तलाठी व एक मंडळ अधिकारी असे दोनच कर्मचारी अन् तहसीलदार उशिरा पोहोचले. त्यामुळे प्रशासनाविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत होते. गावकऱ्यांनी आठ वाजता अडविलेल्या गाड्यांचे टोकन पावणे दहानंतरचे असल्याचे मॅसेज संशय निर्माण करणारे तर आहेतच; परंतु भरलेल्य पाच गाड्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर रिकाम्या करण्याचे गौडबंगाल काय आहे? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. अडविलेली वाहने बिट जमादार रमेश पवार, शिपाई मिलिंद दरेकर यांनी महागाव पोलिस ठाण्यात जमा केली. यावेळी तहसीलदार हेमंत गांगुर्डे, मंडळ अधिकारी गोविंद ठाकरे, तलाठी लक्ष्मण डवले यांनी कारवाई केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र भारती, शहरप्रमुख प्रमोद भरवाडे, नानाराव गावंडे, विजय भारती, दत्तराव खंदारे, अनंता शिंदे, सचिन पाऊलबुद्धे, किशोर पाऊलबुद्धे, सुनिल शिंदे, रामराव पाटील, विष्णू मोंढे, संतोष वारंगे उपस्थित होते. (वार्ताहर)