जेसीबीद्वारे रेतीचा अवैध उपसा सुरूच
By Admin | Updated: July 28, 2014 23:47 IST2014-07-28T23:47:04+5:302014-07-28T23:47:04+5:30
लगतच्या वारा-कवठा येथे खुनी नदीच्या पात्रात जेसीबीद्वारे रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. सदर रेती उपसा रात्री सुरू आहे. त्यामुळे महसूल प्रशासन त्याबाबत अनभिज्ञ असल्याने त्यापासून मिळणार

जेसीबीद्वारे रेतीचा अवैध उपसा सुरूच
पाटणबोरी : लगतच्या वारा-कवठा येथे खुनी नदीच्या पात्रात जेसीबीद्वारे रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. सदर रेती उपसा रात्री सुरू आहे. त्यामुळे महसूल प्रशासन त्याबाबत अनभिज्ञ असल्याने त्यापासून मिळणार लाखोंचा महसूल पाण्यात जात आहे.
वारा व कवठा या दोन्ही गावाच्या मधात खुनी नदीचे पात्र आहे़ नदीचे पात्र काही भागात फुगीर तर काही भागात थोडे अरूंद आहे़ कवठावासीयांना ये-जा करण्याकरिता नदीवर पूलसुध्दा आहे़ पांढरकवडा तालुक्यातील काही रेती घाटांचा लिलाव झाला. त्यात कवठा घाटाचाही लिलाव झाल्याची माहिती आहे़ मात्र वारा घाटाचा लिलाव झाला नाही. रेती तस्कर नेमके याच बाबीचा लाभ घेत आहे. वारा व कवठा या दोन्ही घाटातून गेल्या १५ दिवसांपासून जेसीबीद्वारे रेतीचा अवैध उपसा होत आहे. पूर्वी हा रेती उपसा नदीच्या पूर्वेला कवठा रेती घाटात सुरू होता़ मात्र त्यावेळी वारावासीयांनी त्याला विरोध करताच संबंधित कंत्राटदाराने रेती उपसा बंद केला होता. वारा ग्रामस्थांच्या विरोधानंतर काही दिवस रेतीचा उपसा बंद ठेवण्यात आला. मात्र आता पुन्हा गेल्या २६ जुलैच्या मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजतापर्यंत जेसीबीद्वारा रेतीचा उपसा करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित कंत्राटदार नियम धाब्यावर बसवून काही ग्रामस्थांची दिशाभूल करून हा रेती उपसा करीत आहे़
जेसीबीद्वारे रेती उपसा करण्यासाठी भूजल विभागाची परवानगी आवश्यक असते. त्यानंतर तहसील प्रशासन व भूजल विभाग पाहणी करते. या पाहणीनंतर भूगर्भातील व परिस्थितीजन्य बाबींची बारकाईने चौकशी केल्यानंतर नियम व अटी लादून रेती उपशाला परवानगी देण्यात येते़ त्यातही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच रेती उपसा करता येतो. मात्र तसे येथे काहीच घडले नाही़ तरीही संबंधित कंत्राटदार व जेसीबी चालकाच्या संगनमताने मध्यरात्री रेतीचा अवैध उपसा सुरूच आहे़
आधीच अत्यल्प पावसाने परिसरातील नागरिक चिंतेत आहे़ नदीला पाणी नाही, गुरेढोरे जनावरांना प्यायला पाणी नाही़ त्यात रेती तस्कर अवैध उपसा करून अडचणीत भर टाकत आहे़ सदर घाटावर आत्तापर्यंत शेकडो ट्रक रेतीचा अवैध उपसा झाल्याची विश्वसनीय माहिती आहे़ दिवसा जेसीबी मालक कवठा गावात दूरवर झाडात जेसीबी लपवून ठेवतात़ रात्री जेसीबी नदीत उतरवून रेतीचा उपसा करतात. हा गोरखधंदा गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरू आहे़ ही शेकडो ट्रक रेती रस्ता व पुलाच्या बांधकामात वापरण्यात येत असल्याची माहिती आहे़ शासनाला मात्र लाखो रूपयांचा चुना लागत असून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे़
वारा येथे नदीवर स्मशानभूमी आहे़ तेथे मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात़ त्या जागी रेतीच्या उपशामुळे १०-१० फुटांचे खड्डे तयार झाले आहेत़ तसेच रस्त्याचीसुध्दा वाट लागली आहे़ नदीच्या पूर्वेला जाड रेती, तर पश्चिमेकडे बारीक रेती आहे़ रेती घाट चालक व पूल तसेच रस्ता कामाचे कंत्राटदार यांच्या संगनमताने हा गोरखधंदा सुरू आहे़ त्यावर तहसील प्रशासनाने तकाळ कारवाई करण्याची मागणी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)