खंडाळा घाटात गौण खनिजाचे अवैध उत्खनन

By Admin | Updated: May 14, 2016 02:23 IST2016-05-14T02:23:59+5:302016-05-14T02:23:59+5:30

येथील वाशिम मार्गावरील खंडाळा घाटात गेल्या काही महिन्यांपासून गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे.

Illegal mining of minor minerals in Khandala Ghat | खंडाळा घाटात गौण खनिजाचे अवैध उत्खनन

खंडाळा घाटात गौण खनिजाचे अवैध उत्खनन

रस्त्यालगत मोठ्ठाले खड्डे : अपघाताची टांगती तलवार
प्रकाश लामणे पुसद
येथील वाशिम मार्गावरील खंडाळा घाटात गेल्या काही महिन्यांपासून गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे. राज्य मार्गालगतच मोठ्ठाले खड्डे खोदले जात असल्याने अपघाताची टांगती तलवार कायम असते. वन विभागाच्या हद्दीतून वारेमाप गौण खनिज चोरले जात असले तरी कारवाई मात्र केली जात नाही.
पुसद तालुक्यात वन आणि महसूल विभागाच्या हद्दीत गौण खनिजाची चोरी नवीन बाब नाही. बांधकामासाठी मुरुम, वीटभट्टीसाठी लालमाती आणि गिट्टीसाठी दगडांची चोरी केली जात आहे. राजरोसपणे मोठ्ठाले खड्डे खोदून ट्रक-ट्रॅक्टरच्या द्वारे वाहतूक केली जाते. पुसद-वाशिम मार्गावर असलेल्या खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन केले जात आहे. वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी मोठ्ठाले खड्डे खोदण्यात येत आहे. पुसद शहर व तालुक्यातील इतर ठिकाणच्या वीटभट्ट्यांसाठी येथून लालमाती चोरीस जात आहे. तर बांधकामासाठी मुरुमही मोठ्या प्रमाणात उत्खनन केला जातो. सर्व नियमांना बगल देऊन होत असलेल्या उत्खननाने घाटात मोठ्ठाले खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे या भागातील मोठ्याल्या वृक्षांचे मूळ उघडे पडले आहे. साध्या वाऱ्यातही वृक्ष कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राज्य मार्गालगत होत असलेल्या या उत्खननाचा फटका रस्त्यालाही बसत आहे. अगदी रस्त्यालगतच मोठमोेठ्ठाले खड्डे खोदून ठेवले आहे. यामुळे वाहनांना अपघाताची भीती असून वाहनाला अपघात झाल्यास या खड्ड्यांमुळे थेट दरीत कोसळू शकते.
वन विभागाचे कर्मचारी या परिसरात तैनात असले तरी गौण खनिज तस्करांवर कारवाई केली जात नाही. एखाद वेळेस कारवाई केलीच तर केवळ दंड ठोकून त्यांना सोडून दिले जाते. यामुळेच तालुक्यातील गौण खनिज तस्करांचे मनोबल वाढले आहे.
ट्रक-ट्रॅक्टर द्वारे भर दिवसाही वाहतूक केली जाते. गौण खनिजाआड सागवान तस्करी होत असल्याची माहिती आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. खंडाळा घाटात सहज फेरफटका मारला तरी मोठ्ठाले खड्डे दिसून येतात. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे दिसू नये याचेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Illegal mining of minor minerals in Khandala Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.