अवैध धंदे गुंडाळा अन्यथा गय नाही
By Admin | Updated: June 14, 2015 02:39 IST2015-06-14T02:39:12+5:302015-06-14T02:39:12+5:30
माझे डोळे लागलेले नाहीत, मला सर्वकाही दिसते आहे. तुमच्या हद्दीतील अवैध कारभार तत्काळ थांबवा, ...

अवैध धंदे गुंडाळा अन्यथा गय नाही
अखिलेशकुमार सिंह : ठाणेदारांना तंबी
यवतमाळ : माझे डोळे लागलेले नाहीत, मला सर्वकाही दिसते आहे. तुमच्या हद्दीतील अवैध कारभार तत्काळ थांबवा, माझ्या पथकाने धाड घातल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, अशा शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी जिल्हाभरातील ठाणेदारांना इशारा दिला.
एसपींची पहिलीच सविस्तर क्राईम मिटींग शनिवारी पार पडली. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. अवैध धंद्यांबाबत एसपींचे काय धोरण राहते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना सिंग यांनी कोणत्याही परिस्थितीत धंदे चालणार नाहीत, असे बजावले. डिटेक्शन वाढवा, गुन्हेगारी थांबवा, वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करा, कुणाच्या घरात कोण भाड्याने राहतो, कुणाच्या संशयास्पद हालचाली आहेत का, धोकादायक व्यक्ती शहरात राहतात का, याची तपासणी करा, भाड्याने घरे देणाऱ्या मालकांना सतर्कतेच्या आवश्यक सूचना द्या, रात्री-अपरात्री अचानक लॉज, हॉटेल, ढाबे, बार याची तपासणी करा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. खात्याची बदनामी होणार नाही, अशा पद्धतीने वागा, गैरमार्गाने पैसा कमावू नका, सर्वकाही येथेच सोडून जावे लागते, असे सांगताना एसपींनी गीता साराचा हवाला दिला. यावेळी जिल्हाभरातील उघडकीस न आलेल्या गंभीर गुन्ह्यांवरसुद्धा नजर टाकण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)