सामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित

By Admin | Updated: August 5, 2014 23:36 IST2014-08-05T23:36:21+5:302014-08-05T23:36:21+5:30

आर्णी तालुक्याच्या सावळीसदोबा परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न दुर्लक्षित आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला जात नाही. आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Ignored the questions of the masses | सामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित

सामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित

विविध समस्या : भारनियमनाशिवाय वीज पुरवठा खंडित
सावळीसदोबा : आर्णी तालुक्याच्या सावळीसदोबा परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न दुर्लक्षित आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला जात नाही. आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर झाला आहे. याविषयी परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. महसूल आणि वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्यांना शेतीचे पट्टे मिळाले नाही. गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. भोगवट-२ च्या जमिनीचे भोगवट-१ मध्ये रूपांतर करण्यात आले नाही. दारिद्र्यरेषेखालील आदिवासी आणि बौद्ध बांधवांना सुटलेल्या पुरवणी यादीत समाविष्ट करून घरकुलाचा लाभ मिळाला नाही. गतवर्षी पाऊस आणि पुराने खचलेल्या विविध दुरुस्तीसाठी मदत मिळाली नाही. यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत आले आहे.
सावळी-पळशी जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे आणि उखडलेली गिट्टी अपघातास निमंत्रण देत आहे. भारनियमनाशिवाय वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. अनेकांचे रेशनकार्ड जीर्ण झाले आहे. तहसील कार्यालय नसल्याने विविध प्रकारच्या कागदपत्रांसाठी पायपीट करावी लागते. पोलीस ठाणे नसल्याने गंभीर घटना घडल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यास अडचणी येतात. या व इतर प्रश्नांना घेवून क्रांतिदिनी ९ आॅगस्टला येथील नायब तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्यास बेमूदत उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती आणि जनता विकास आघाडीचे पदाधिकारी मुबारक तंवर यांनी येथे दिला. यावेळी अनेक नेते मंडळी मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Ignored the questions of the masses