महिलांनी ठरविले तर कुटुंबाची स्थिती बदलेल
By Admin | Updated: March 9, 2017 00:19 IST2017-03-09T00:18:52+5:302017-03-09T00:19:30+5:30
परिस्थिती बदलवायची असेल, तर अखंड परिश्रम घ्यावे लागतील. त्याकरिता महिलांनी पुढाकार घेतल्यास कुटुंबाची स्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही,

महिलांनी ठरविले तर कुटुंबाची स्थिती बदलेल
सचिंद्र प्रताप सिंह : महिला मेळावा, महिला आर्थिक विकास महामंडळाचा पुढाकार
यवतमाळ : परिस्थिती बदलवायची असेल, तर अखंड परिश्रम घ्यावे लागतील. त्याकरिता महिलांनी पुढाकार घेतल्यास कुटुंबाची स्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
येथील कोल्हे सभागृहात महिला मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. महिला आर्थिक विकास महामंडळ व समन्वयीत कृषी विकास प्रकल्पातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला होते. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत देशपांडे, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, ऋषीकेश घ्यार, सविता देशमुख, राम साहू, शैलेंद्र जिद्देवार, शेख रसूल, राहू वसाके, सुमित गोल्हर यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांनी गृह उद्योगासोबत विविध क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. कठोर परिश्रमाने प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दीपक सिंगला यांनी आपले कुटुंब सक्षम करण्यासाठी प्रत्येक महिलांनी हातभार लावण्याची गरज असल्याचे सांगितले. मेळाव्यात यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. पशु सखी, इंटरनेट साथी, कायदा साथी, गाव विकास समिती, सीएमआरसी उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. तुरडाळ प्रकल्पाकरिता मारेगाव आणि नेर सीएमआरसीला धनादेश देण्यात आला. संचालन सुनंदा मानकर, आभार समिर देशमुख यांनी मानले. (शहर वार्ताहर)