परिवर्तनासाठी व्यक्तिपूजेपेक्षा विचारधारा महत्त्वाची
By Admin | Updated: November 30, 2015 02:23 IST2015-11-30T02:23:22+5:302015-11-30T02:23:22+5:30
आरक्षणाचे जनक महाराष्ट्रात जन्मले परिणामी महाराष्ट्रात सामाजिक चेतना निर्माण झाली. मात्र त्याचे फळ उत्तरप्रदेश आणि बिहारला मिळाले आहे.

परिवर्तनासाठी व्यक्तिपूजेपेक्षा विचारधारा महत्त्वाची
चंद्रशेखर यादव : यवतमाळ येथे स्मृती पर्वाच्या उद्घाटनाला प्रचंड गर्दी
यवतमाळ : आरक्षणाचे जनक महाराष्ट्रात जन्मले परिणामी महाराष्ट्रात सामाजिक चेतना निर्माण झाली. मात्र त्याचे फळ उत्तरप्रदेश आणि बिहारला मिळाले आहे. बहुसंख्य असूनही एकाशी दुसऱ्याचे पटत नाही. व्यक्तीपूजक झाल्याने त्यांचे विभाजन झाले. सर्व प्रकारच्या व्यवस्थेत बदल होण्यासाठी व्यक्तिपूजेला नाकारून विचारधारा स्वीकारण्याची गरज आहे. काहींजवळ ज्ञान आहे तर इमान नाही, काहींजवळ इमान आहे तर ज्ञान नाही. हे दोन्ही एकत्र येण्यासाठी सर्वांना एकजूट करण्याची गरज आहे, असे आवाहन भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर यादव यांनी केले.
स्मृतीपर्वाच्या उद्घाटन पर्वात ते ‘ओबीसी के अच्छे दिन आ सकते है. बशर्ते की वह जागरूक रहे’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सत्यशोधक गोलमेज परिषदेचे राष्ट्रीय संयोजक ज्ञानेश्वर गोबरे होते. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीपर्वाला २८ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. संत कबीर विचारपीठावर सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक समाजातील बुद्धिवंतांनी एकत्र येण्याची गरज आहे. हे शक्य झाले तर सर्वच क्षेत्रात चांगले दिवस येऊ शकतात.
स्मृतीपर्वाच्या दुसऱ्या सत्रात ‘महात्मा फुले यांचे सार्वजनिक सत्य व त्याची सध्य स्थितीतील उपयुक्तता’ या विषयावर नागपूरचे सत्यशोधक प्रबोधनकार अरविंद माळी यांनी आपले विचार व्यक्त केले. महात्मा फुले यांनी शिक्षण सार्वजनिक तेव्हा मनुवादी घाबरले. त्यांनी मनुस्मृती नाकारली म्हणून मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना विरोध केला. सत्य-असत्य कळण्याची क्षमता शिक्षणामुळे येते. हेच मनुवाद्यांना नको होते. संत कबीर विचारपीठावर यावेळी डॉ. दिलीप घावडे, प्रा. काशिनाथ लाहोरे, राजेश खवले, प्रा. सविता हजारे,
मायाताई गोबरे, रवी नागरीकर, प्रा. सलिम चव्हाण, अशोक तिखे, प्रा. रमेश पिसे आदी मंडळी उपस्थित होती.
प्रारंभी समता गीत गायक आणि प्रबोधनकार भीमदास नाईक तसेच त्यांच्या संचाने सादर केली. ललिता वाघ यांनी वंदन गीत सादर केले. राजेश मुके यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. दीपक वाघ यांनी सूत्रसंचालन केले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)