बांगलादेशी आरोपींची ओळखपरेड

By Admin | Updated: October 25, 2015 02:18 IST2015-10-25T02:18:18+5:302015-10-25T02:18:18+5:30

पुसदमधून बनावट प्रमाणपत्र मिळवून भारतीय नागरिक असल्याचे भासविणाऱ्या दोन बांगलादेशींची शनिवारी तालुका दंडाधिकाऱ्यांपुढे ओळखपरेड घेण्यात आली.

Identity of Bangladeshi accused | बांगलादेशी आरोपींची ओळखपरेड

बांगलादेशी आरोपींची ओळखपरेड

बनावट प्रमाणपत्र : पोलीस तपासात अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न
पुसद : पुसदमधून बनावट प्रमाणपत्र मिळवून भारतीय नागरिक असल्याचे भासविणाऱ्या दोन बांगलादेशींची शनिवारी तालुका दंडाधिकाऱ्यांपुढे ओळखपरेड घेण्यात आली.
मोहमद आझिम गाझी माजेद गाझी (२७) व हबीब ऊर्फ हबील शेख रूबल शेख (२५) रा.बांगलादेश अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना पुसद ग्रामीणचे ठाणेदार अनिल कुरळकर व उपनिरीक्षक राजेंद्र नाईक, पोलीस कर्मचारी किसन राठोड, सुभाष जाधव, आसिफ शेख यांनी मुंबईतून पुसदमध्ये आणले. ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांची येथील तहसील कार्यालयात ओळखपरेड घेण्यात आली. नायब तहसीलदार देवानंद धबाले, नामदेव इसळकर, डॉ.राजू बाबळे, महा-ई सेवा केंद्राचे हनुमंत आऱ्हाडे आदी यावेळी उपस्थित होते. या बांगलादेशी आरोपींना बोगस प्रमाणपत्रांचे पाठबळ देणारा नेमका कोण? याचा शोध पोलीस घेत आहे. मात्र पोलिसांच्या तपासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही सूर आहे. या तपासात त्यांना अपेक्षित व पाहिजे त्या तत्परतेने सहकार्य, मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड ऐकायला मिळते. (प्रतिनिधी)

नगरपरिषदेचा कारभार : आधी प्रमाणपत्र, नंतर जन्म
बांगलादेशी आरोपींच्या बनावट प्रमाणपत्राच्या अनुषंगाने पुसद नगरपरिषद, महसूल विभाग आणि महा-ई सेवा केंद्रांचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे. यातील आरोपी हबीब ऊर्फ हबील याची जन्मतारीख पुसद नगरपरिषदेमध्ये २८ मे १९९४ अशी नोंदविली गेली आहे. तर त्याला याच नगरपरिषदेने २८ मार्च १९९३ चे जन्मतारखेचे प्रमाणपत्र दिले आहे. आधी प्रमाणपत्र व नंतर जन्माचा हा अफलातून नमुना पुसद शहरात चर्चेचा विषय बनला आहे. हबीबच्या नावाने १६ फेब्रुवारी १९९३ रोजीचे भारतीय निवडणूक आयोगाचे मतदार कार्डही बनविण्यात आले आहे. त्यात हबीबचे वय ३२ वर्षे नोंदविले गेले. त्याची जन्मतारीख व हे नोंदविलेले वय पाहता तो जन्माच्यावेळीच थेट ३२ वर्षांचा असल्याचे दाखविले गेले आहे. हे दोन्ही बांगलादेशी घुसखोर मुंबईत कारागृहात असताना त्यांच्या नावाने १६ आॅगस्ट २०१५ रोजी अधिवास प्रमाणपत्रासाठी पुसद तालुक्यातील वेणी खु. च्या महा-ई सेवा केंद्रात अर्ज करण्यात आला होता. त्यासाठी रेशनकार्ड, ईलेक्शनकार्ड व जन्मतारखेचा दाखलाही बनावट जोडला गेला. या कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता सदर महा-ई सेवा केंद्राने एका दिवसात १७ आॅगस्टलाच अधिवास प्रमाणपत्र जारी केले. ऐरव्ही कोणत्याही प्रमाणपत्रासाठी किमान आठ दिवस लावणाऱ्या या केंद्राने बांगलादेशींचे एका दिवसात प्रमाणपत्र दिल्याने हे केंद्र पोलिसांच्या लेखी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Web Title: Identity of Bangladeshi accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.