विद्यार्थ्यांना आदर्शाचे धडे

By Admin | Updated: September 15, 2014 00:25 IST2014-09-15T00:25:00+5:302014-09-15T00:25:00+5:30

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठीच बहुतांश पालक खेड्यातून शहराकडे धाव घेत आहे. शाळांची भरमसाठ फी आणि

Ideal lessons for students | विद्यार्थ्यांना आदर्शाचे धडे

विद्यार्थ्यांना आदर्शाचे धडे

फुलसावंगी : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठीच बहुतांश पालक खेड्यातून शहराकडे धाव घेत आहे. शाळांची भरमसाठ फी आणि खासगी शिकवणी लावून मुलांना शिक्षण देत आहे. मात्र शहरासारखेच दर्जेदार शिक्षण देण्याचा विडा उमरखेड तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांंनी उचलला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षणाचे धडे दिले जात आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांकडे पालकांनी पाठ फिरविल्याचे सर्वत्र दिसत आहे. परंतु निंगनूर केंद्रांतर्गत टाकळी इजारा ही शाळा त्याला अपवाद आहे. या गावातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षण देण्याचा प्रयत्न चालविला आहे. शहरातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना बौद्धिक विकासात मागे टाकतील, एवढे कौशल्य टाकळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यात निर्माण झाले आहे.
दैनंदिन स्वरूपात संविधान, प्रतीज्ञा, राष्ट्रगीत, राष्ट्रवंदना, प्रश्नमंजूषा, दिनविशेष, बोधकथा, समूह गीत, ठळक बातम्या, पसायदान व तारखेनुसार विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. प्रत्येक वर्ग खोलीत आरसा, कंगवा, हॅन्डवॉशसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी जादा उपस्थिती असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या खिशाला उपस्थिती स्टार लावण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये बचतीचे महत्व रुजावे म्हणून प्रत्येक वर्गात डब्बे ठेवण्यात आले आहे. पालकांकडून खाऊसाठी मिळणारे पैसे इच्छेनुसार विद्यार्थी डब्यात टाकतात. त्याची नोंद रजिस्टरवर घेतली जाते. दरवर्षी १ मे रोजी विद्यार्थ्यांंना ही रक्कम व्याजासह परत केली जाते. शिक्षक एस.आर. घुमे यांनी सुरू केलेल्या या प्रयोगाने विद्यार्थ्यांना बचतीचे महत्व कळले आहे.
सातव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे चार गट पाडून त्यांना विविध विषयावर प्रश्न विचारून विजयी गटाला प्रोत्साहित करण्यात येते. यासाठी शिक्षक टी.आर. जगडमवार प्रयत्न करीत आहे. आर.एन.कुसळे हे शिक्षक आठवीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासंदर्भात मार्गदर्शन करतात. शिक्षणाधिकारी एन.आर.वड्डे, केंद्र प्रमुख रामदास केंद्रे यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक एन.बी. हाके विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आता ही शाळा आदर्श झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ideal lessons for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.