पांढरकवडा आदिवासी प्रकल्पात ‘आयएएस’ पीओ

By Admin | Updated: December 2, 2015 02:36 IST2015-12-02T02:36:05+5:302015-12-02T02:36:05+5:30

पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

'IAS' PO in Pandharvada Tribal Project | पांढरकवडा आदिवासी प्रकल्पात ‘आयएएस’ पीओ

पांढरकवडा आदिवासी प्रकल्पात ‘आयएएस’ पीओ

शासनाचे आदेश : दीडशे कोटींचे बजेट, कारभार सुधारण्याचे नवीन प्रकल्प अधिकाऱ्यांपुढे आव्हान
यवतमाळ : पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपककुमार मीना असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्याकडून पांढरकवडा येथील उपविभागीय महसूल अधिकारी पदाचीही जबाबदारी राहणार आहे.
राज्यातील सात संवेदनशील आदिवासी प्रकल्पांमध्ये थेट ‘आयएएस’ प्रकल्प अधिकारी नेमण्याचे शासनाचे आदेश आहेत. या यादीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी प्रकल्पाचा समावेश आहे. आदिवासी खात्याचे बिग बजेट लक्षात घेता वने, कृषी, वित्त व अन्य विभागातील अधिकारी पीओ म्हणून प्रतिनियुक्तीवर या विभागात येण्यास उत्सुक असतात. अनेकदा त्यासाठी राजकीय स्तरावरून मोर्चेबांधणी केली जाते. कित्येकदा रॉयल्टीचा राजमार्गही स्वीकारला जातो. ही प्रतिनियुक्ती मिळावी म्हणून अधिकारी वर्ष-वर्षभर बदलीच्या ठिकाणी रुजू न होता आजाराचे कारण पुढे करून मंत्रालयात चकरा मारीत असतात. पांढरकवडा येथे अलिकडच्या काळात प्रेरणा देशभ्रतार या थेट ‘आयएएस’ अधिकारी पीओ म्हणून लाभल्या होत्या. त्यांच्या बदलीनंतर हे प्रकल्प कार्यालय थेट ‘आयएएस’च्या प्रतीक्षेत होते. कधी राज्य सेवेतील अधिकारी तर कधी अतिरिक्त प्रभारावर कारभार सुरू होता. अनेक महिन्यानंतर आता पांढरकवडा प्रकल्पाला पुन्हा थेट ‘आयएएस’ अधिकारी दीपककुमार मीना यांच्या रुपाने लाभले आहेत. ते पदभारही स्वीकारणार आहेत. मीना हे परिविक्षाधीन ‘आयएएस’ आहेत. गेली काही दिवस त्यांनी तहसीलदार, एसडीओ, बीडीओ म्हणून सेवा दिली आहे. आता त्यांची नियुक्ती जिल्ह्यातच पांढरकवडा येथील एसडीओ तसेच आदिवासी प्रकल्पात पीओ म्हणून करण्यात आली आहे. यातील एक त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार राहील.
पांढरकवडा प्रकल्पांतर्गत आदिवासींच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून ऐकायला मिळते आहे. आता ‘आयएएस’ पीओ आल्याने ही ओरड थांबणार आहेत. दिवाळीची सुटी संपली मात्र अद्यापही विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये परतले नाही. परंतु कागदोपत्री संपूर्ण उपस्थिती दाखवून आहार पुरवठा नोंदविला जातो. एवढेच नव्हे तर प्रकल्प कार्यालयाला आठ विद्यार्थी उपस्थित असताना दररोज ८० विद्यार्थ्यांचा आहार शिजल्याचे कळविले जाते. बहुतांश आदिवासी आश्रमशाळांची हीच स्थिती आहे. खासगी आश्रमशाळांचा कारभार तर आणखीणच गंभीर आहे. हा कारभार सुधारण्याचे आव्हान थेट ‘आयएएस’ असलेल्या दीपककुमार मीना यांच्यापुढे राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 'IAS' PO in Pandharvada Tribal Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.