मैं आज भी फेके हुए पैसे नही उठाता..!
By Admin | Updated: January 22, 2017 00:09 IST2017-01-22T00:09:20+5:302017-01-22T00:09:20+5:30
मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता... ‘दिवार’ सिनेमात बुट पॉलीश करणारा बाल अमिताभ जेव्हा हे वाक्य बोलला, तेव्हा प्रेक्षक दिवाने झाले होते.

मैं आज भी फेके हुए पैसे नही उठाता..!
छोट्या करणचा बाणा : सातवीचा विद्यार्थी चमकवतो बूट अन् स्वत:चे स्वप्नही
अविनाश साबापुरे यवतमाळ
मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता... ‘दिवार’ सिनेमात बुट पॉलीश करणारा बाल अमिताभ जेव्हा हे वाक्य बोलला, तेव्हा प्रेक्षक दिवाने झाले होते. तोच स्वाभिमान, तोच कणखर बाणा यवतमाळच्या तहसील चौकात शुक्रवारी दिसला. तेरा वर्षांच्या करणने बुट पॉलीश करून दिला. ग्राहकाने नोट दिली. पण देता-देता हातून निसटून खाली पडली. पोराने पैशांकडे पाहिलेही नाही. ग्राहक झुकला. नोट उचलली अन् लहानग्या करणच्या खिशात कोंबली. करणने अँग्री यंग मॅनचा प्रसिद्ध डायलॉग म्हटला नाही, पण त्याच्या नजरेची भाषा ग्राहकाला कळली. पोराचे काम पाहून जाता-जाता ग्राहकाने त्याला जादा दहा रुपये देण्याचा प्रयत्न केला. पण पोरगा म्हणाला, ‘जेवढं काम केलं तेवढेच पैसे पाह्यजे.’
तहसील चौकात इतरांचे बुट पॉलीश करून देणारा हा पोरगा आहे करण ! तो काही शाळाबाह्य नाही. शाळेबाहेरच्या जगातही तो प्रत्यक्ष जगण्याचे धडे गिरवत आहे. भोसा परिसरातील एका राजकीय नेत्याच्या शाळेत तो सातवीत शिकतो. ‘सहावीत माह्यावाला वर्गातून दुसरा नंबर आला होता...’ करणने अभिमानाने सांगितले.
भोसाच्या सुंदरनगर भागात त्याचे घर आहे. वडील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करतात. काकाचे तहसील चौकात बुट पॉलीशचे दुकान आहे. शाळा सुटल्यावर करण तेथे स्वखुशीने येतो. ‘मले पोलीस बनाचं हाय. त्येच्यासाठीच तं शाळेत जातो. सकाळी न् संध्याकाळी बी व्यायाम करतो. अभ्यास आपला राच्च्याले...’ करणची दिनचर्या समजून घेताना त्याचे डोळे बरेच काही सांगत होते. शाळेच्या स्पर्धेत कबड्डीत उत्तम खेळल्यामुळे करणला प्रमाणपत्र मिळाले आहे. मोठे होऊन पोलीस व्हायचे आहे, हे स्वप्न तो जेव्हा बोलून दाखवतो, तेव्हा त्याचे डोळे आनंदाने चमकतात. पण दररोज बाहेरची दुनियादारी प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या करणच्या स्वप्नाला वास्तवाचे भानही आहे. म्हणूनच तो म्हणाला, ‘पोलीस तं बनाचंच हाय. पण समजा नाहीच झालो पोलीस तं हे (दुकानातलं) काम हायेच. म्हणून तं दुकानात बसतो येऊन...’
स्वत:च्या पायावर उभं होता आलं पाहिजे, या ध्यासातून करण आतापासूनच कामाला लागला आहे. म्हणूनच त्याच्या देहबोलीतून अँग्री यंग मॅनची ‘मैं फेके हुए पैसे नही उठाता’ ही भाषा झळकते. लहानशा वयात अन् गरिबीच्या अंधारातही स्वाभिमानाचे बाळकडू करणच्या नसा-नसात आहे. मित्राने दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे लॉकेट गळ्यात तो अभिमानाने मिरवतो अन् सांगतो... ‘तेच्यावर शिवाजी हाय. मले आवडते!’