मी एमएलसी, मुलाला एमएलए बनवा !
By Admin | Updated: August 19, 2014 23:57 IST2014-08-19T23:57:41+5:302014-08-19T23:57:41+5:30
प्रस्थापित नेत्यांविरुद्ध जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्ययही आला. त्यानंतरही काँग्रेसची नेते मंडळी ‘मी आणि माझे’ ही घराणेशाही सोडण्यास तयार नाही.

मी एमएलसी, मुलाला एमएलए बनवा !
माणिकराव ठाकरेंची घराणेशाही : प्रदेशाध्यक्षांकडूनच राज्यभर चुकीचा संदेश, काँग्रेस कार्यकर्ते नाराज
यवतमाळ : प्रस्थापित नेत्यांविरुद्ध जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्ययही आला. त्यानंतरही काँग्रेसची नेते मंडळी ‘मी आणि माझे’ ही घराणेशाही सोडण्यास तयार नाही. स्वत: एमएलसी असताना माणिकराव ठाकरेंनी मुलाला एमएलए बनविण्यासाठी जोरदार धडपड चालविल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांपुढे वेगळा आदर्श निर्माण करणे अपेक्षित आहे. मात्र तेच चुकीच्या वाटेने जाऊन पक्षालाही चुकीच्या मार्गावर नेत असल्याचे विदारक चित्र आहे. त्यांच्या वागणुकीने राज्यभरातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश पोहचू लागला आहे. दिग्रस-दारव्हा हा माणिकराव ठाकरे यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. परंतु मी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला पक्ष परवानगी देणार नाही, असे कारण पुढे करीत माणिकरावांनी विधानसभेचे मैदान सोडले आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी स्वत: लोकसभेच्या आखाड्यात उतरू शकतात, मग नेमकी माणिकरावांनाच काँग्रेस पक्ष परवानगी कशी काय नाकारु शकतो, याचे कोडे सामान्य जनतेला उलगडलेले नाही. वास्तविक माणिकरावांनी तर स्वत: विधानसभेच्या रिंगणात उतरुन शक्यतोवर निवडणूक बिनविरोध करून अथवा एकही दिवस प्रचाराला न येता मताधिक्याने निवडून येऊन आदर्श निर्माण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांची मतदारसंघात तेवढी पकड असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती अगदीच याच्या विपरित आहे. त्यांच्या मतदारसंघातच कुणी त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)