पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू
By Admin | Updated: October 22, 2016 01:30 IST2016-10-22T01:30:04+5:302016-10-22T01:30:04+5:30
दसऱ्यासारख्या सणाच्या दिवशी पती सायंकाळी दारू पिऊन घरी आला. यामुळे संतापलेल्या पत्नीने त्याला जाब विचारला. त्यावरून दोघात वाद झाला.

पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू
लोहारा येथील घटना : दसऱ्याच्या दिवशी झाला होता वाद
यवतमाळ : दसऱ्यासारख्या सणाच्या दिवशी पती सायंकाळी दारू पिऊन घरी आला. यामुळे संतापलेल्या पत्नीने त्याला जाब विचारला. त्यावरून दोघात वाद झाला. पत्नीने फेकून मारलेली वीट पतीच्या डोक्याला लागली. यात पतीची प्रकृती गंभीर झाली. त्याचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला.
शिल्पा प्रदीप घरत, (२५) रा.शिवाजीनगर लोहारा, असे महिलेचे नाव आहे. दसऱ्याच्या दिवशी ११ नोव्हेंबरला शिल्पाने मोठ्या उत्साहाने घरात गोडधोड स्वयंंपाक बनविला. घराबाहरे पडलेल्या पतीची ती वाट बघत होती. सायंकाळी तिचा नवरा प्रदीप सदाशिव घरत (२८) दारूच्या नशेत तर्र होऊन घरी परतला. हे बघून शिल्पाचा राग अनावर झाला. तिने जाब विचारण्यास सुरूवात करताच प्रदीपने तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यातून सुटका करून घेण्यासाठी तिने पतीकडे वीट भिरकावली. ती प्रदीपच्या डोक्यात लागली. तो लागलीच खाली कोसळला. नंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान नागपूर येथे १५ नोव्हेंबरला प्रदीपचा मृत्यू झाला. या प्रकरणात प्रदीपची बहीण कुसुम गंगाधर घोटेकर रा. मुगंसाजीनगर लोहारा, यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिल्पाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास लोहाऱ्याचे ठाणेदार संजय डहाके करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)